India vs England, Mohammed Siraj Workload: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्लेमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आता दुसरा सामना बर्मिंघममध्ये सुरू आहे. या सामन्यात वर्कलोड मॅनेज करण्यासाठी जसप्रीत बुमराहला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवण्यात आलं आहे. त्याच्या जागी आकाश दीपचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजी आक्रमणाची धुरा मोहम्मद सिराजच्या हाती आहे. सिराजने ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडली. त्याने पहिल्याच डावात गोलंदाजी करताना इंग्लंडच्या ६ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली, त्यावेळीच सांगण्यात आलं होतं की बुमराह ५ पैकी ३ सामने खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना झाल्यानंतर त्याला दुसऱ्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजी आक्रमणाचं नेतृत्व सिराज करणार, हे देखील आधीच ठरलं होतं.
बुमराहला वर्कलोडमुळे विश्रांती, पण सिराजचं काय?
या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने ४३.४ षटकं गोलंदाजी केली होती. त्यानंतर दुसऱ्या स्थानी असलेल्या सिराजने या डावात ४१ षटकं टाकली. आता दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने १९.३ षटकं टाकली. अजून दुसऱ्या डावातील खेळ शिल्लक आहे. या डावातही तो १५ हून अधिक षटकं टाकेल. या सामन्यांतर अजूनही ३ सामने शिल्लक आहेत. बुमराहच्या वर्कलोडचा विचार केला जातो, मग सिराजच्या वर्कलोडचं का? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
मोहम्मद सिराजला २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्याला जवळपास सर्व सामनयांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने गोलंदाजीही केली आहे. यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गोलंदाजी करताना त्याने १५६ षटकं टाकली होती. तर जसप्रीत बुमराहने शेवटच्या कसोटीत दुखापतग्रस्त होण्यापूर्वी १५१ षटकं टाकली होती. त्यामुळे बुमराहसह मोहम्मद सिराजचा वर्कलोड मॅनेज करण्याचीही तितकीच गरज आहे.