MS Dhoni Will Play IPL 2026 Or Not: आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी खेळाडूंच्या ट्रेडबद्दल किंवा इतर संघांमध्ये जाण्याबद्दल मोठ्या चर्चा सुरू आहेत. यादरम्यान महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या पुढील हंगामात खेळणार का, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात कायम आहे. धोनीने देखील गेल्या हंगामात याबाबत काही स्पष्ट उत्तर दिलं नव्हतं. पण धोनीने पुढील हंगामात खेळावं या चाहत्याच्या आग्रहाला धोनीने दिलेल्या उत्तराने सर्वांचं टेन्शन वाढलं आहे.

कदाचित पुढील हंगामात धोनी खेळण्याची शक्यता कमी असल्याचं त्याच्या वाक्यावरून दिसून येतंय, धोनीच्या गुडघ्याच्या दुखापतीच्या वाक्याने चाहतेदेखील चिंतेत आहेत. धोनीने निवृत्ती न घेता खेळत राहावं अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा आहे, पण दरम्यान व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये माहीने त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीबद्दल मोठा खुलासा केला आहे.

आयपीएल २०२६ धोनी खेळणार की नाही?

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान धोनीने आयपीएल २०२६ च्या हंगामात खेळण्याबद्दल वक्तव्य केलं आहे. धोनी म्हणाला, “पुढच्या हंगामात मी खेळू शकेन की नाही, याबाबत मी आता काहीच सांगू शकत नाही. मी खेळणार की नाही हा निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे अजून डिसेंबरपर्यंतचा वेळ आहे. मी काही महिने माझ्या फिटनेसवर लक्ष देईन आणि त्यानंतर निर्णय घेईन.”

धोनीचं बोलून होताच एक चाहता मोठ्याने म्हणाला ‘सर तुम्ही खेळलंच पाहिजे’, हे ऐकताच धोनीने लगेच उत्तर दिलं. “अरे या गुडघ्यांचं दुखणं कोण बघेल मग?” हे बोलताच धोनीसह सर्वच जण हसू लागले.

४४ वर्षीय धोनी गेल्या काही वर्षांपासून गुडघ्याच्या दुखण्याने त्रस्त आहे. २०२३ मध्ये चेन्नई संघाने जेतेपद जिंकल्यानंतर धोनी गुडघ्याला पट्टी बांधून विक्ट्री लॅपमध्ये फिरताना दिसला. यानंतर अनेकदा खेळताना धोनीला त्रास होत असल्याचे देखील स्पष्ट दिसले आहे. यामुळे, धोनी आयपीएलमध्येही विकेटदरम्यान धावून फारशा धावा करत नाही आणि त्यामुळे खालच्या फळीत la फलंदाजीला येतो. धोनीला २०२३ पासून गुडघ्याचा त्रास होता आणि तरीही त्याने संघाच्या आयपीएल विजयात मोठी भूमिका बजावली. पण जेतेपद जिंकल्यानंतर धोनीने गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली आहे. धोनीनंतर आता ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर चेन्नई सुपर किंग्स संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी आहे.