कोल्हापूरच्या लाल मातीचा सुगंध जरी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर दरवळत असला तरी त्याचा टणकपणा मात्र खेळाडूंची अग्निपरीक्षा पाहात होता. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबई शहरच्या मुलींना सिंधुदुर्ग आणि नागपूरचा पराभव करणे फारसे जड गेले नाही. छत्रपती शिवाजी करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी मुंबईने सिंधुदुर्गचा ५१-११ असा सहज धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. त्यानंतर मुंबईने दुसऱ्या सामन्यात नागपूरचा २४-१३ अशा फरकाने पराभव करून आपले बाद फेरीतील स्थान पक्के केले. पुरुषांमध्ये मुंबई शहरने नागपूर आणि जालन्याला हरवून बाद फेरी गाठली.
यंदाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत बलाढय़ रेल्वेला टक्कर देण्याची किमया महाराष्ट्राने स्नेहल साळुंखेच्या नेतृत्वाखाली साधली. त्याच स्नेहलने प्रारंभ उत्तम केला. दुर्दैवाने तिसऱ्याच मिनिटाला पायाला झालेल्या दुखापतीमुळे तिला मैदानाबाहेर राहावे लागले, पण विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडू सुवर्णा बारटक्के आणि शिवछत्रपती विजेत्या गौरी वाडेकरने मुंबईची अस्मिता जपली. १२व्या मिनिटाला मुंबईने पहिला लोण चढविला, त्यानंतर दुसऱ्या सत्रात मुंबईने सिंधुदुर्गवर आणखी दोन लोण चढविले. सुवर्णाने ७ चढायांमध्ये ३ बोनस गुणांसहित एकंदर ६ गुण कमविले, तर गौरीने ७ चढायांमध्ये एका बोनस गुणासहित ६ गुण मिळविले. उत्तरार्धात सामना आवाक्यात असल्याचे पाहून मुंबईने नवोदित खेळाडूंना संधी दिली. अंकिषा सातर्डेकरने अष्टपैलू ख्ेाळाडूचा प्रत्यय देत ५ चढायांत ३ गुण आणि एक यशस्वी पडकही केली. सिंधुदुर्गकडून सायली परब आणि सोनाली धुरी यांनी चांगली लढत दिली. दुसऱ्या सामन्यात मुंबईने नागपूरला तोंड वर काढण्याची संधीच दिली नाही. सुवर्णा बारटक्के आणि आरती नार्वेकर मुंबईच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
पुरुषांच्या विभागामध्ये मुंबईने गौरव शेट्टीच्या दमदार चढायांच्या बळावर नागपूरचा ३२-२१, तर जालन्याचा ५४-११ असा पराभव केला आणि आपल्या वर्चस्वाची चुणूक दाखवली. विशाल मानेने दमदार पकडी केल्या. मुंबई उपनगरला नागपूरने मंगळवारी पहिल्याच सामन्यात बरोबरीत रोखले होते, पण बुधवारी उपनगरच्या संघाने जालन्याच्या दुबळ्या संघाला ६७-१२ अशी आरामात धूळ चारली. अजय यादव आणि महेश डोईफोडे यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले.
..आणि रायगडचा वाद मिटला!
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन बरीच वष्रे कार्यरत असताना रायगड जिल्हा हौशी कबड्डी संघटनेला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने हिरवा कंदील दिला का, अशी जोरदार चर्चा कोल्हापूरमध्ये बुधवारी सुरू होती. बुधवारी झालेल्या राज्य संघटनेच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर मात्र राज्य संघटनेला आपली चूक उमगल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. धर्मादाय आयुक्तांमार्फत कोणत्याही नव्या जिल्हा संघटनांना मान्यता देण्यापूर्वी राज्य संघटनेला विचारणा करण्यात येते, परंतु रायगड जिल्हा हौशी कबड्डी संघटनेविषयी कोणीही आक्षेप घेतला नाही आणि त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले गेल्याचे म्हटले जात आहे, परंतु असे काहीही घडलेले नसल्याचे राज्य संघटनेचे म्हणणे आहे. पण चूक लक्षात आल्यानंतर मात्र महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आता धर्मादाय आयुक्तांना ‘अनावधानाने रायगड जिल्हा हौशी कबड्डी संघटनेला मान्यता दिली गेली’ असे पत्र देणार असल्याचे कळते. हे सारे कार्यकारिणी समितीच्या बैठकीतच ठरल्याचे समजते. त्यामुळे वेळीच चूक लक्षात आल्यामुळे एकाच जिल्ह्य़ात उभी राहू पाहणाऱ्या दुसऱ्या संघटनेचे पंख छाटले गेले आहेत. याविषयी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह मोहन भावसार यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ‘‘शासकीय सभेने आणि राज्याच्या कार्यकारिणी समितीने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीला मंजुरी दिली आहे. आम्ही धर्मादाय आयुक्तांना असे कोणतेही पत्र दिलेले नाही. त्यामुळे रायगड जिल्हा हौशी कबड्डी संघटनेला मान्यता देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रायगड जिल्हा कबड्डी संघटनाच त्या ठिकाणची अधिकृत कार्यरत संघटना आहे.’’