पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विजयी; मध्य प्रदेशचा चिवट प्रतिकार
रणजी स्पर्धेची तब्बल ४० जेतेपदे नावावर असणाऱ्या मुंबईने यंदा मध्य प्रदेशला नमवत अंतिम फेरी गाठली. थेट विजयासह दिमाखात अंतिम फेरी गाठण्याची संधी मुंबईकडे होती. मात्र नमन ओझा आणि हरप्रीत सिंग यांच्या शतकी खेळींमुळे मुंबईला पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विजयावरच समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत मुंबई आणि सौराष्ट्र समोरासमोर असणार आहेत.
विजयासाठी ५७१ धावांचे अवघड लक्ष्य मिळालेल्या मध्य प्रदेशने पाचव्या आणि अंतिम दिवशी २ बाद ९९ वरुन पुढे खेळायला सुरुवात केली. आदित्य श्रीवास्तवला बद्री आलमने बाद केले. त्याने १४८ चेंडूत १० चौकारांसह ६८ धावा केल्या. यानंतर नमन ओझा आणि हरप्रीत सिंग या जोडीने चौथ्या विकेटसाठी १५९ धावांची भागादारी रचत पराभव टाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. पहिल्या डावात शतक हुकलेल्या ओझाने दुसऱ्या डावात १३ चौकार आणि एका षटकारासह ११३ धावांची खेळी साकारली. यंदाच्या हंगामात शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या हरप्रीत सिंगने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत शतक झळकावले. त्याने ११ चौकार आणि एका षटकारासह १०५ धावा केल्या. कामचलाऊ गोलंदाज सूर्यकुमार यादवने ओझाला बाद करीत ही जोडी फोडली. पाठोपाठ भविन ठक्करने हरप्रीतला तंबूत परतावले. मात्र उर्वरित थोडय़ा वेळात अंकित दाणे आणि जगदीप बावेजा यांनी संयमी खेळ करीत कोणतीही पडझड होऊ दिली नाही.
मुंबईने पहिल्या डावात ३७१ धावा केल्या. श्रेयस अय्यरने सर्वाधिक ९० धावा केल्या. चंद्रकांत साकुरेने ५ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मध्य प्रदेशला केवळ २२७ धावांचीच मजल मारता आली. नमन ओझाने ७९ धावा केल्या. मुंबईतर्फे बलविंदर संधूने ५ बळी घेतले. भक्कम आघाडी मिळालेल्या मुंबईने दुसऱ्या डावात ४२६ धावांचा डोंगर उभारला. सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे यांनी शतकी खेळी साकारली.
मध्य प्रदेशने ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३६१ धावा केल्या. सामना अनिर्णित अवस्थेत संपला. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे मुंबईने सामना जिंकत अंतिम फेरी गाठली. आदित्य तरेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : ३७१ आणि ४२६ विजयी विरुद्ध मध्य प्रदेश : २२७ आणि ५ बाद ३६१ (नमन ओझा ११३, हरप्रीत सिंग १०५)
सामनावीर : आदित्य तरे
