कोलकाता गोलशून्य बरोबरीसह इंडियन सुपर लीगच्या अंतिम फेरीत

माजी विजेत्या अ‍ॅटलेटिको डी कोलकाताने बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या परतीच्या लढतीत यजमान मुंबई सिटी एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखून इंडियन सुपर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र मुंबईला हा पराभव पचवता आला नाही आणि सामना संपताच त्यांनी पाहुण्या संघाशी हाणामारी केली. मुंबईचा बदली खेळाडू थिएगो कुन्हाने मैदानावर धाव घेत कोलकाताच्या प्रितम कोटलला लाथ मारली. त्यामुळे दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांवर धावून आले. कोलकाताच्या विजयाच्या आनंदात मुंबईच्या खेळाडूंनी टाकलेला हा मिठाचा खडा प्रेक्षकांनाही आवडला नाही. त्यांनी मुंबई संघाच्या या वागण्याचा निषेध केला. कोलकाताने पहिल्या लीगमध्ये ३-२ असा विजय मिळवला होता आणि त्याच जोरावर त्यांनी अंतिम फेरी गाठली.

छेत्रीने सोपी संधी गमावली..

प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या स्टेडियममध्ये पहिल्या सत्रात मुंबई आणि कोलकाता या दोन्ही संघांनी समसमान वर्चस्व गाजवले. यजमानांनी घरच्या पाठीराख्यांचा फायदा उचलत दमदार सुरुवात केली. चौथ्या मिनिटाला मुंबईकडून गोल झाला, परंतु पंचांनी ऑफ साइड दिल्याने त्यांची पाटी कोरीच राहिली. सोनी नॉर्डे, मॅटीयास डेफेडेरीको आणि सुनील छेत्री यांनी आक्रमणाची जबाबदारी स्वीकारताना कोलकाताच्या गोलजाळीवर आक्रमण सुरु ठेवले. नॉर्डेने डाव्या बाजूने जोरदार आक्रमण केले. सहाव्या मिनिटाला मुंबईला गोल करण्याची संधी चालून आली होती. छेत्री आणि गोलमध्ये कोलकाताचा गोलरक्षक अडथळा होता, परंतु छेत्रीला देबजित मझुमदरला चकवण्यात अपयश आले. पहिल्या सत्रात एकीकडे मुंबईच्या खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव जाणवत होता, तर दुसरीकडे कोलकाताने घोटीव खेळ केला. अर्थात त्यांना गोल करण्याची संधी निर्माण करता आली नाही. त्यांचा बचावपटू रॉबर्ट लाल्थलामुआना याला (१६ व ४५ मि.) दोन पिवळे कार्ड मिळाल्याने मैदानाबाहेर जावे लागले. मैदानाबाहेरही दोन्ही संघांच्या डगआऊटमध्ये बसलेल्या सहयोगींमध्ये शाब्दीक चकमक उडाली. पंचांच्या मध्यस्थीमुळे ही चकमक थोडक्यावर क्षमली.

सामन्यानंतर हाणामारीचा थरार

दहा खेळाडूंसह मैदानावर उतरलेल्या कोलकाताने पहिल्या लीगमधील आघाडीमुळे परतीच्या लढतीत सावध खेळ करण्यावर भर दिला. मुंबईने सुरुवातीच्या पहिल्या दोन मिनिटांत गोल करण्याची संधी निर्माण केली. परंतु कोलकाताचा गोलरक्षक देबजितने ती परतवून लावली. कोलकाताने या लढतीत प्रमुख खेळाडू इयान ुम, हेल्डर पोस्टिगा यांना विश्रांती दिली होती. दुसऱ्या सत्रात त्यांना मैदानावर उतरवले जाईल अशी अपेक्षाही फोल ठरली. अखरेच्या तीन मिनिटांत मुंबईला गोल करण्याची संधी होती, परंतु दोन्ही वेळा बचावपटू ल्युसियान गोईयनने ती गमावली. गोलशून्य बरोबरीनंतर मुंबईचे स्पध्रेतील आव्हानही संपुष्टात आले. मात्र हाणामारीच्या सामन्याने आयएसएलला बट्टा लावला. आयोजकांनीही याची गंभीर दखल घेतली. थिएगोने मैदानावर धाव घेत कोलकाताच्या खेळाडूंना लाथा मारल्या. मग दोन्ही संघांचे खेळाडू भिडले. थिएगो व कोलकाताच्या जुआन बेलेंकोसोलर पंचांनी लाल कार्ड दाखवले.

कोलकाताला चांगला प्रतिसाद

मुंबईच्या घरच्या मैदानावर लढत होत असली तरी पाहुण्या कोलकाताचा चाहता वर्ग मोठा होता. स्टेडियमच्या सर्व कोपऱ्यांत कोलकाताचे चाहते दिसत होते.