पीटीआय, टोक्यो

परस्पर विरोधी कामगिरीचे प्रदर्शन करताना भारताच्या नीरज चोप्रा आणि पॅरिस ऑलिम्पिक विजेत्या अर्शद नदीम यांनी बुधवारी जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक प्रकारात अंतिम फेरी गाठली. यामुळे पुन्हा एकदा आंतराष्ट्रीय स्तरावरील जागतिक स्पर्धेसारख्या भव्य व्यासपीठावर पुन्हा एकदा नीरज-नदीम यांच्यात सुवर्णपदकासाठी चुरस राहणार आहेत. अर्थात, या दोघांनाही अँडरसन पीटर्स आणि ज्युलियन वेबर यांचे आव्हान राहणार आहे.

भारताचा सचिन यादव (८३.६७ मीटर) सर्वोत्तम बारा खेळाडूंच्या कामगिरीच्या निकषावर अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. भारताच्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नांत ८४.८५ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीसाठी थेट पात्रता मिळविली. नदीम, पीटर्स आणि वेबर यांना थेट पात्रतेसाठी एकापेक्षा अधिक प्रयत्न लागले. मात्र, तिघांचेही प्रयत्न नीरजपेक्षा सरस ठरले आहेत. सलग दोनवेळा विजेतेपद मिळविणारा पीटर्स ८९.५३ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह आघाडीवर आहे. त्याच्या पाठोपाठ वेबरने (८७.२१ मीटर) स्थान मिळविले. ज्युलियस येगोनेही (८५.९६ मीटर) सरस कामगिरी केली. नदीमने (८५.२८ मीटर) तिसऱ्या प्रयत्नांत पात्रता मिळवली. नीरजची कामगिरी सहाव्या क्रमांकाची ठरली.

जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरजच्या कामगिरीमुळे भारताची एकमात्र पदकाची आशा कायम राहिली. आता विजेतेपद टिकविण्याचा तिसरा खेळाडू ठरण्यासाठी नीरजला अंतिम फेरीत नदीम, पीटर्स, वेबर यांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. योग्य वेळी क्षमता दाखवून देत नीरजने नेहमीच बाजी मारली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आज, गुरुवारी होणाऱ्या अंतिम फेरीत तमाम भारतीय चाहत्यांच्या नजरा नदीमच्या सुवर्णफेकीकडे रोखलेल्या असतील.

सचिनचीही चमक

या वेळी स्पर्धेत भारताचे चार स्पर्धक सहभागी झाले होते. नीरजच्या थेट पात्रतेपाठोपाठ सचिन यादव (८३.६७मीटर) अशा सरस कामगिरीच्या जोरावर ‘अ’ गटातून पात्र ठरला. तो दहाव्या स्थानावर आहे. रोहित यादव (७७.८१ मीटर), यशवीर सिंग (७७.५१ मीटर) यांना अपयश आले. दरम्यान, अन्य स्पर्धा प्रकारात भारताचे अपयश कायम राहिले. पुरुषांच्या दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत अनिमेश कुजुर (२०.७७ मीटर) पात्रता फेरीतच आव्हान गमावून बसला.