पीटीआय, पॅरिस
भारताचा दोन ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने डायमंड लीगच्या पॅरिस टप्प्यात विजेतेपद मिळवले. नीरजने केलेली ८८.१६ मीटर फेक ही सर्वोत्तम ठरली.
कारकीर्दीत ९० मीटरचा टप्पा गाठल्यानंतर नीरजला पुन्हा हीच मजल मारण्यात अपयश आले असले, तरी दोन वर्षांत प्रथमच डायमंड लीगच्या एखाद्या टप्प्यात विजेतेपद मिळवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ९० मीटरचा टप्पा गाठणारे पाच खेळाडू होते. मात्र, नीरजने पहिल्याच प्रयत्नात केलेली ८८.१६ मीटरची फेक त्याला विजेता ठरविण्यास पुरेशी ठरली. नीरजने दुसऱ्या प्रयत्नांत ८५.१० मीटर फेक केली. नंतरचे तीन प्रयत्न अपयशी ठरले. अखेरच्या सहाव्या यशस्वी प्रयत्नांत त्याला ८२.८९ मीटरच फेक करता आली. वेबर ८७.८८ मीटरच्या फेकसह दुसऱ्या स्थानावर, तर ब्राझीलचा लुईझ मॉरिसियो ८६.६२ मीटरसह तिसऱ्या स्थानावर राहिला.
नीरजने यापूर्वी २०२३ मध्ये लॉस एंजिलिस टप्प्यात ८७.६६ मीटरच्या कामगिरीसह अखेरचे विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर डायमंड लीगच्या विविध सहा टप्प्यांत त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. कारकीर्दीत २०१७ मध्ये पॅरिसलाच कुमार गटाचे जागतिक विजेतेपद मिळविल्यानंतर प्रथमच डायमंड लीगमध्ये सहभागी झाला होता. त्या वेळेस नीरजला ८४.६७ मीटर कामगिरीसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. नीरज आता २४ जून रोजी ओस्ट्रावा येथील स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यानंतर स्वत:च आयोजित केलेल्या नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत ५ जुलै रोजी तो सहभागी होईल. या स्पर्धेला जागतिक अॅथलेटिक्सने ‘अ’ श्रेणीचा दर्जा दिला आहे.
नीरजने याच वर्षी १६ मे रोजी डायमंड लीगच्या दोहा येथील टप्प्यात ९०.२३ मीटर फेक केली होती. मात्र, त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तेव्हा वेबरने ९१.०६ मीटर फेक करून विजेतेपद मिळविले होते.
‘‘स्पर्धेत ९० मीटरची फेक करण्याचा कायम प्रयत्न राहील. दोहामध्ये मी ९० मीटरच्या दडपणातून बाहेर पडलो होतो. त्यामुळे आपणही ९० मीटरचा टप्पा पुन्हा पुन्हा गाठू शकतो याचा आत्मविश्वास आला. अर्थात, हवामान आणि चांगल्या परिस्थितीवर ते अवलंबून आहे. शरीराचीदेखील साथ मिळायला हवी. पण, या हंगामात खूप दूरवर फेक करू शकेन असा आत्मविश्वास वाटतो,’’ असे नीरजने सांगितले.
नीरजने या हंगामाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेतील निमंत्रिताच्या स्पर्धेत ८४.५२ मीटरच्या फेकीसह केली होती. पण, या स्पर्धेला ‘फ’ श्रेणीचा दर्जा होता. त्यानंतर दोन वेळा वेबरने नीरजला हरवले. या वेळी मात्र नीरज सरस ठरला.
पॅरिसमध्ये नीरज, वेबरसह कारकीर्दीत ९० मीटरचा टप्पा गाठलेल्यांमध्ये केनियाचा माजी जगज्जेता ज्युलियस येगो, त्रिनिदाद-टोबॅगोचा माजी ऑलिम्पिक विजेता केशॉर्न वॉलकॉट, ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स यांचा समावेश होता. वॉलकॉट (८१.६६ मीटर) चौथ्या स्थानावर राहिला, तर पीटर्स (८०.२९ मीटर) आणि येगो (८०.२६ मीटर) यांनी अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान पटकावले.
मी माझ्या फेकीवर खूश आहे. स्पर्धेदरम्यान माझी धावण्याची गती खूप वेगवान होती. त्यामुळे वेगावर नियंत्रण मिळवू शकलो नाही. पण, फेक आणि पहिल्या स्थानावर समाधानी आहे. – नीरज चोप्रा.