बुलवेयो : अष्टपैलू बास डी लीडेच्या (५ बळी आणि १२३ धावा) झंझावातामुळे नेदलँड्सने एकदिवसीय विश्वचषक पात्रता स्पर्धेतील ‘सुपर सिक्स’ फेरीच्या निर्णायक लढतीत स्कॉटलंडला चार गडी आणि ४३ चेंडू राखून पराभूत केले. यासह नेदरलँड्सने भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या मुख्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
गुरुवारी झालेल्या ‘सुपर सिक्स’ फेरीतील सामन्यात डी लीडेने उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करताना नेदरलँड्सला एकहाती सामना जिंकवून दिला. प्रथम डी लीडेने वेगवान गोलंदाजी करताना स्कॉटलंडचा निम्मा संघ गारद केला. त्यामुळे स्कॉटलंडचा डाव ५० षटकांत ९ बाद २७७ धावांवर मर्यादित राहिला. त्यानंतर डी लीडेने फलंदाजीत आपली गुणवत्ता सिद्ध करताना ९२ चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या साहाय्याने १२३ धावांची अप्रतिम खेळी केली. त्यामुळे नेदरलँड्सने २७८ धावांचे लक्ष्य ४२.५ षटकांतच गाठत विजय नोंदवला. गुणतालिकेत स्कॉटलंडला मागे टाकण्यासाठी त्यांनी विजयी लक्ष्य ४४ षटकांत गाठणे गरजेचे होते.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने ९ बाद २७७ धावा केल्या. त्यांच्याकडून ब्रेंडन मॅकमलन (११० चेंडूंत १०६) आणि कर्णधार रिची बेिरगटन (८४ चेंडूंत ६४) यांनी चांगल्या खेळी केल्या. प्रत्युत्तरात डी लीडेला विक्रमजीत सिंग (४९ चेंडूंत ४०) आणि सकीब झुल्फिकार (३२ चेंडूंत नाबाद ३३) यांनी साथ दिल्याने नेदरलँड्सला विजय मिळवता आला. डी लीडे आणि झुल्फिकार यांनी सहाव्या गडय़ासाठी ११.३ षटकांतच ११३ धावांची भागीदारी रचली.
‘सुपर सिक्स’ फेरीतील एक सामना शिल्लक असलेल्या श्रीलंकेने आठ गुणांसह अग्रस्थान मिळवत विश्वचषकातील प्रवेश आधीच निश्चित केला आहे. नेदरलँड्स आणि स्कॉटलंड यांच्या खात्यावर प्रत्येकी सहा गुण आहेत. मात्र, नेदरलँड्सने सरस निव्वल धावगतीच्या बळावर एकदिवसीय विश्वचषकातील स्थान निश्चित केले.
विश्वचषकातील १० संघ
भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्स.
५ नेदरलँड्सचा संघ पाचव्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्यांनी यापूर्वी १९९६, २००३, २००७, २०११मध्ये विश्वचषकात सहभाग नोंदवला होता.