नवी दिल्ली : खेलो इंडिया उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि तळागाळातील खेळांना चालना देण्यासाठी नव्या वर्षापासून खेलो इंडिया योजनेअंतर्गत नव्या स्पर्धांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी केली. क्रीडा मंत्री मांडविया यांच्या वतीने खेलो इंडियाचे वार्षिक वेळापत्रक सादर करण्यात आले. या नव्या कार्यक्रमांतर्गत खेलो इंडिया स्पर्धा आणि अन्य स्पर्धांच्या मालिकाच घेण्यात येणार आहेत. यामध्ये बहुतेक ईशान्यकडील खेळांचा समावेश करण्यात आला आहे. ‘‘तळागाळातील स्पर्धा तसेच खेळांना चालना देण्यासाठी हे वर्षभराचे धोरणात्मक वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे भारताची क्रीडा परिसंस्था भक्कम करण्यास मदत मिळेल,’’ असे मांडविया म्हणाले. खेलो इंडिया स्पर्धांच्या वर्षभराच्या कार्यक्रमामुळे देशांतर्गत स्पर्धा संरचना मजबूत होण्याचा विश्वास मांडविया यांनी व्यक्त केला.
या नव्या स्पर्धा होणार
क्रीडा मंत्रालयाने खेलो इंडिया उपक्रमाला अधिक महत्त्व देताना विविध स्पर्धा सुरू केल्या आहेत. यातून विविध खेळांत देशातील तरुण प्रतिभेची ओळख होणार असून, त्याचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांना दिशा देण्यासाठी या स्पर्धा महत्त्वाच्या ठरतील, असे मांडवीय म्हणाले. नव्या होणाऱ्या स्पर्धेत खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स, खेलो इंडिया ईशान्य क्रीडा स्पर्धांचा प्रामुख्याने समावेश असेल. वर्षभराच्या कार्यक्रमात या स्पर्धांची भर पडणार आहे. आतापर्यंत खेलो इंडिया युवा, विद्यापीठ, पॅरा आणि हिवाळी अशा चार स्पर्धा होत होत्या.
याबरोबरच खेलो इंडिया मार्शल आर्ट्स, खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा अशा स्पर्धांचा समावेश करून स्वदेशी आणि पारंपरिक खेळांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे मांडविया यांनी स्पष्ट केले.