PAK vs NZ Champions Trophy 2025 Match Highlights in Marathi: पाकिस्तान संघाला घरच्या मैदानावरच चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोर जावं लागलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्याच सामन्यात यजमान पाकिस्तानला न्यूझीलंडकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. टॉम लॅथम आणि विल यंग यांच्या शानदार शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने ३२० धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, पण प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या साधारण फलंदाजीमुळे पाकिस्तानी संघ केवळ २६० धावांत सर्वबाद झाला आणि ६० धावांनी पराभूत झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२९ वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर पाकिस्तानमध्ये आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने पाकिस्तानी चाहते हा सामना पाहण्यासाठी कराची नॅशनल स्टेडियममध्ये उपस्थित होते. पण पाकिस्तानच्या खेळाडूंनी चाहत्यांना नक्कीच निराश केली. संघाचा स्टार खेळाडू बाबर आझमने सर्वांनाच निराश केले. मोठी खेळी बाबरने केली खरी पण त्याने मोठे प्रभावी फटके खेळू शकला नाही.

पाकिस्तानने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरूवातीला पाकिस्तानने चांगली सुरूवात करत हा निर्णय योग्य ठरवला. पण जसजसा सामना पुढे गेला, तसा न्यूझीलंडने गियर बदलत कमालीची फलंदाजी केली. न्यूझीलंडने सुरूवातीला ३ विकेट्स गमावले असून २२ षटकांत १०० धावा केल्या. पण त्यानंतर विल यंग आणि टॉम लॅथम यांनी उत्कृष्ट शतकी खेळी करत संघाला मोठी धावसंख्या गाठण्यात मदत केली. तर ग्लेन फिलिप्सने महत्त्वपूर्ण ६१ धावांची खेळी केली आणि ३२० धावा केल्या.

न्यूझीलंड संघाने दिलेल्या ३२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला मोठा धक्का बसला. फखर जमान नियमाप्रमाणे २० मिनिटे फलंदाजीसाठी उतरू शकला नाही. त्यामुळे बाबर आझम आणि सौद शकीलची जोडी मैदानात उतरली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच संघाच्या धावांवर अंकुश ठेवला आणि धावा करण्याची संधी दिली. सौद शकील स्वस्तात बाद झाला. बाबरने ६४ धावांची खेळी केली. पण त्याने बरेच डॉट चेंडू खेळले. ज्याचा संघाला फटका बसला. बाबरने ९० चेंडूत ६४ धावा केल्या.

याशिवाय संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान ३ धावा करत बाद झाला. यानंतर फखर जमानने २४ धावा तर सलमान आगाने ४२ धावांची झटपट खेळी केली. तर खुशदिल शाहने ४९ चेंडूत १ षटकार आणि १० चौकारांसह ६९ धावांची खेळी करत संघाच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या. पण विल्यम ओरूकच्या चेंडूवर तो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. तर शाहीन आफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांनी फलंदाजी करताना एकूण ५ षटकार लगावले. हॅरिसने एकट्याने ३ षटकार लगावले आणि संघाला अधिकाधिक धावा कशा करता येतील, यावर भर दिला. पण हे तिन्ही फलंदाज छोट्या महत्त्वपूर्ण खेळी करत झटपट बाद झाले आणि संघ २६० धावांवर गडगडला.

न्यूझीलंडकडून विल्यम ओरूक आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी ३ विकेट घेतले. तर मॅट हेन्रीने २, मायकेल ब्रेसवेलने १ आणि नॅथन स्मिथने १ विकेट घेतली. तर पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हॅरिस रौफने प्रत्येकी २ विकेट घेतल्या आणि अबरार अहमदने १ विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand beat pakistan by 60 runs in champions trophy opener babar azam slow inning pak vs nz bdg