IND vs ENG 2nd Test Updates in Marathi: एजबेस्टन कसोटीत भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याची नाणेफेक बेन स्टोक्सने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण पहिल्याच दिवशी भारताचा निम्मा संघ माघारी परतला आहे. तर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. दुसऱ्या कसोटीकरता भारताने संघात मोठे बदल केले. त्यापैकी एक बदल म्हणजे नितीश कुमार रेड्डी. पण या सामन्यात तो स्वस्तात बाद झाला.
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले. ज्यामध्ये नितीश कुमार रेड्डी, आकाशदीप, वॉशिंग्टन सुंदर यांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. तर जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि साई सुदर्शन यांना बाहेर करण्यात आलं आहे. यापैकी नितीश रेड्डीला पहिल्याच दिवशी फलंदाजीची संधी मिळाली. पण तो १ धाव करत विचित्रपणे बाद झाला. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल आहे.
ऋषभ पंतने गिलसह चांगली भागीदारी रचत सामना पुढे नेला. पण ऋषभ पंत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. भारताची खालची फलंदाजी फळी पहिल्या सामन्यात फेल ठरल्याने बदल करण्यात आले. पण हा बदलही उपयोगी पडला नाही. नितीश रेड्डीने ६ चेंडू खेळत १ धाव केली.
६२व्या षटकात ख्रिस वोक्स गोलंदाजीला आला. नितीश रेड्डी दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईकवर आला. त्याने पहिले दोन तेंडू खेळून काढले. तिसरा चेंडू आऊटसाईड ऑफ स्टम्प पडला आणि चेंडू बाहेरच्या दिशेने जात असल्याचं रेड्डीला वाटलं आणि त्याने तो चेंडू सोडला. पण पडल्यानंतर चेंडू फिरला आणि आतल्या दिशेने जाऊन थेट स्टम्पसवर जाऊन आदळला. रेड्डीला वाटलं चेंडू बाहेर जात आहे त्यामुळे खेळण्याची गरज नाही आणि त्याने बॅट वर केली. पण चेंडूने थेट जाऊन त्रिफळा उडवला.
नितीश रेड्डी बाद झाल्यानंतर चेंडू सोडलेल्या स्थितीत तसाच उभा राहिला आणि इंग्लंडचा संघ मात्र याचा आनंद साजरा करताना दिसला. ख्रिस वोक्सने संघाला पाचवी विकेट मिळवून दिली. यासह चांगल्या सुरूवातीनंतर भारतीय संघाचा डाव पुन्हा एकदा कोसळणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. भारताने तिसऱ्या डावात आतापर्यंत ६८ षटकांत ५ बाद २४३ धावा केल्या आहेत.