पद्माकर काशिनाथ शिवलकर ऊर्फ पॅडीशिवाय मुंबई क्रिकेटचा इतिहास अधुरा ठरू शकेल. मुंबई क्रिकेटच्या सुवर्णकाळात तब्बल २८ वष्रे त्यांनी संघाचे प्रतिनिधित्व केले. वयाच्या ४८व्या वर्षी त्यांनी समाधानाने निवृत्ती पत्करली. नशिबाच्या खडूसपणामुळे या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजाला भारताचे प्रतिनिधित्व करता आले नाही. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार नुकताच त्यांना जाहीर करून त्यांच्या क्रिकेटमय सेवेचा यथोचित सन्मान केला आहे. आपल्या जादुई फिरकीच्या बळावर प्रतिस्पर्धी संघाची भंबेरी उडवणारे पॅडी म्हणजे ‘मुंबईचा हुकमी एक्का’, अशा शब्दांत त्यांच्यासोबत खेळलेल्मुंबईतील माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

क्रिकेटच्या सेवेला उचित न्याय

पॅडीला बीसीसीआयचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला, याचा मन:पूर्वक आनंद झाला. रणजी क्रिकेटची सांख्यिकी पाहिली तरी पॅडीचे मुंबई क्रिकेटसाठी काय योगदान आहे, ते सहज स्पष्ट होते. स्थानिक क्रिकेटमध्ये इतके यश मिळवूनसुद्धा भारतीय संघाकडून खेळायचे भाग्य त्याला लाभले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. मात्र त्याच्या क्रिकेटच्या सेवेला उचित न्याय या पुरस्काररूपात बीसीसीआयने दिला आहे. त्या दिवसात आमचा सराव संपल्यावर अंधार संपेपर्यंत तयारी सुरू असायची. परंतु पॅडी एकटा यष्टी भेदण्याचा सराव करायचा. सोबत कुणी नसल्यामुळे चेंडू आणायलासुद्धा स्वत: जायचा. यासाठी चिकाटी लागते. गुडलेंग्थवर चेंडू टाकून यष्टी उडवण्याची ही अचूकता साधण्यासाठी तो वर्षांनुवष्रे सराव करायचा. नंतर मुंबई संघातील स्थान पक्के झाल्यावरसुद्धा त्याची मेहनत कायम राहिली.

१९७१मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई-महाराष्ट्र यांच्यातील अंतिम फेरीचा सामना माझ्या डोळ्यांसमोर अजूनही ताजा आहे. अजित वाडेकर, सुनील गावस्कर, एकनाथ सोलकर, फारूख इंजिनीयर, अशोक मंकड आणि दिलीप सरदेसाई असे सहा खेळाडू वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक दौऱ्यावर गेल्यामुळे मुंबईचा संघ थोडासा दुबळा होता. चंदू बोर्डे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या संघाविषयी सर्वच संघांनी धसका घेतला होता. मधू गोगटे, चेतन चौहान, हेमंत कानेटकर, निकोलस सलढाणा, अन्वर शेख, संजय कीर्तने, विठ्ठल जोशी यांच्यासारखे धडाकेबाज खेळाडू महाराष्ट्राच्या संघात होते. या संघाने अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात प्रत्येक सामन्यात पाचशेच्या आसपास धावसंख्या उभारली होती. त्यावेळी साखळीसुद्धा महाराष्ट्राचा संघ मुंबईपेक्षा वरचढ ठरला होता. मात्र अंतिम सामन्यातील दोन्ही डावांत ते अनुक्रमे २३० आणि २०५ धावांवर गारद झाले. मुंबईला ही किमया साधता आली ती पॅडीच्या फिरकीमुळे. त्याने पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात सहा बळी घेत मुंबईच्या विजयाध्याय लिहिला. माझ्या नेतृत्वाखाली त्याच्यातील आत्मविश्वास मग वाढत गेला.    सुधीर नाईक, भारताचे माजी कसोटीपटू

 

मुंबईच्या यशाचे मोठे श्रेय पॅडीला

पॅडीसोबत मी अनेक वष्रे मुंबईकरिता आणि टाटा कंपनीसाठी खेळलो. पॅडी हा खऱ्या अर्थाने विजयवीर (मॅचविनर) होता. कारण एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता त्याच्याकडे होती. इरापल्ली प्रसन्ना, बी. एस. चंद्रशेखर यांच्या तोडीची गुणवत्ता त्याच्यामध्ये होती. फक्त पॅडी कसोटी क्रिकेटमध्ये खेळू न शकल्यामुळे कमनशिबी ठरला. गुणवत्ता असूनही, पॅडी दुर्लक्षित राहिला. मुंबईचा संघ रणजी क्रिकेटमध्ये बरीच वष्रे जिंकला. या कालखंडात पॅडीसुद्धा संघात होता. त्यामुळे मुंबईच्या यशाचे मोठे श्रेय पॅडीकडेसुद्धा जाते.

१९८५मध्ये रोहटक येथे मुंबईचा हरयाणाविरुद्ध सामना होता. कपिल देव हरयाणाचे नेतृत्व करीत होता, तर मुंबईचे सुनील गावस्कर. दोन्ही संघांमध्ये दिग्गज खेळाडूंचा सहभाग होता. राजिंदर सिंग गोयल आणि सरकार तलवार यांच्यासारखे फिरकी गोलंदाज आणि अनुकूल खेळपट्टी यामुळे मुंबईला आपण सहज दोनदा गुंडाळू शकू, याबाबत कपिल आश्वासक होता. फलंदाजीत सुरुवातीला आमची ४ बाद १८ अशी अवस्था होती. परंतु माझी आणि करसन घावरची महत्त्वाची भागीदारी झाल्यामुळे मुंबईच्या धावफलकावर समाधानकारक धावा झळकल्या. पण पॅडीच्या फिरकीच्या बळावर त्यानंतर फॉलोऑन घेत हरयाणाच्या फलंदाजांनी दोनदा हाराकिरी पत्करली. मुंबईने तो सामना डावाने जिंकण्याची किमया साधली होती. मुंबईकडे पॅडीसारखा गोलंदाज आहे, हे कपिलने गृहितच धरले नव्हते. मुंबईचा तो हुकमी एक्का होता. पॅडीच्या खात्यावर बळी नसल्याचे क्वचितच कधी घडले असेल.

पॅडी उत्तम गायकसुद्धा आहे. त्यामुळे मुंबईच्या संघासोबतच्या दौऱ्याला किंवा कार्यक्रमाला त्याला गायला सांगितले की तो कधीच आढेवेढे घ्यायचा नाही. त्यामुळे मोकळ्या वेळात त्यांच्या सुरेल गाण्याची मैफल रंगायची.    दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी कर्णधार

 

झोकून देण्याची वृत्ती प्रेरणादायी!

पॅडीने आयुष्यातील बरीच वष्रे मुंबई क्रिकेटची सेवा केली, त्याचे फळ त्याला मिळाले. मी आणि पॅडीने एकाच वेळी व्यावसायिक क्रिकेटला प्रारंभ केला. मुंबई आणि टाटासाठी खेळलो. पॅडीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला साजेशी गुणवत्ता होती. मात्र त्यावेळी बिशनसिंग बेदी, भागवत चंद्रशेखर, इरापल्ली प्रसन्ना यांच्यासारखे महान फिरकी गोलंदाज भारतीय संघात होते. याशिवाय बापू नाडकर्णी, सलीम दुराणी यांच्यासारखे अष्टपैलू फिरकी गोलंदाज होते. त्यामुळे पॅडीला भारतीय संघातून खेळता आले नाही. मात्र झोकून देण्याची वृत्ती असलेल्या पॅडीची मुंबई क्रिकेटची कारकीर्द ही प्रेरणादायी अशीच आहे. पॅडीला गाण्याची अतिशय आवड आहे. क्रिकेटनंतर गाणे हा त्याचा श्वास आहे. मोहम्मद रफीची गाणी तो छान आवाजात गातो. मलासुद्धा फ्लूट वाजवता येत असल्याने आमची मैफल उत्तम रंगायची.   उमेश कुलकर्णी, भारताचे माजी कसोटीपटू