West Indies vs Pakistan 1st ODI: पाकिस्तानचा संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने दमदार विजयाची नोंद केली आहे. यासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. ब्रायन लारा स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात वेस्टइंडिजने पाकिस्तानसमोर विजयासाठी २८१ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानकडून मोहम्मद रिजवान आणि हसन नवाज यांनी दमदार अर्धशतकं झळकावली. या खेळीच्या बळावर पाकिस्तानने हा सामना ७ चेंडू शिल्लक ठेवून आपल्या नावावर केला.
या सामन्यात वेस्टइंडीजचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र वेस्टइंडीजचा संघ पूर्ण ५० षटकंही खेळू शकला नाही. वेस्टइंडिजच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला. पण संघाचा डाव ४९ षटकात २८० धावांवर आटोपला. वेस्टइंडिजकडून फलंदाजी करताना एविन लुईसने ६०, शाई होपने ५५ आणि रोस्टन चेजने ५३ धावांची खेळी केली. या तिघांच्या अर्धशतकांचा बळावर वेस्टइंडिजने २८० धावांपर्यंत मजल मारली.
पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर नसीम शाहने ३ गडी बाद केले. पाकिस्तानचा संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी आल्यानंतर सॅम अयुब हा एकमेव फलंदाज होता. ज्याला चांगली सुरुवात करून देता आली नाही. इतर सर्व फलंदाजांनी दमदार सुरुवात करून दिली.
पाकिस्तानकडून फलंदाजी करताना बाबर आझमने ४७ धावांची खेळी केली. त्याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. तर मोहम्मद रिजवानने ५३ धावांची दमदार खेळी केली. तो चांगली फलंदाजी करत होता, पण ३८ व्या षटकात त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं. शेवटच्या १२ षटकात पाकिस्तानला विजयासाठी १०० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला आणि हा सामना ७ चेंडू शिल्लक ठेवून आपल्या नावावर केला. यासह पाकिस्तानने १-० ने आघाडी घेतली आहे.