Yousuf Mohammed on Suryakumar Yadav: आशिया चषकात भारताकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट सुरू आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडू भारताविरोधात एकामागून एक गरळ ओकत आहेत. आता तर थेट राष्ट्रीय वाहिनीवरील चर्चेत भारतीय खेळाडूंना शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार युसूफ मोहम्मदने टीव्हीवरील चर्चेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवबदद्ल आक्षेपार्ह शब्द उच्चारला.

रविवारी दुबई येथे झालेल्या भारत – पाकिस्तान सामन्याबद्दल भारतात जोरदार वादळ उठले होते. अनेक राजकीय पक्षांनी हा सामना होऊ नये, यासाठी प्रयत्न केला. तर सोशल मीडियावरही संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच दुबईमध्ये ज्या मैदानात सामना पार पडला, तिथली सर्व तिकीटेही विकली गेली नाहीत. या सर्व घडामोडीनंतर भारतीय संघाने नाणेफेक आणि सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला.

भारतीय क्रिकेट संघाच्या या कृतीने पाकिस्तानच्या पराभवाच्या जखमेवर मीठ चोळले गेले. यानंतर युसूफ मोहम्मदने टीव्हीवरील एका चर्चेत सूर्यकुमार यादवला उद्देशून शिवीगाळ केली. युसूफच्या असंबंध बडबडीवर सूत्रसंचालकानेही नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही युसूफ मोहम्मद सूर्यकुमारबाबत अपशब्द उच्चारत होता.

आशिया चषकाच्या गट ‘अ’मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने ७ विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला. हा पराभव पाकिस्तानला पचवता आलेला नाही. आपल्या खेळाडूंच्या सुमार खेळावर भाष्य करण्यापेक्षा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि त्यांचे खेळाडू भारतीय संघ आणि व्यवस्थापनाला बोल लावण्यात समाधान मानत आहेत. पाकिस्तानी संघासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर १७,००० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या युसूफ मोहम्मदनेही आता भारतीय कर्णधाराला अपशब्द वापरले आहेत.

पाकिस्तानच्या समा वृत्तवाहिनीवर चर्चा सुरू असताना युसूफ मोहम्मदने म्हटले, “भारत सिनेजगताच्या दुनियेतून बाहेर येत नाही. भारताचा संघ पंचाचा वापर करून जिंकत आहेत. पंचाच्या माध्यमातून पाकिस्तानी खेळाडूंना लक्ष्य करण्यात आले. भारताचा संघ जर अशाप्रकारे विजय आपल्या नावावर करत असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे.” यानंतर त्याने सूर्यकुमार यादवला उद्देशून अपशब्द उच्चारले.

युसूफ मोहम्मदने १९९८ ते २०१० या काळात पाकिस्तानसाठी २८८ एकदिवसीय सामने, ९० कसोटी सामने आणि ३ टी२० सामने खेळले. युसूफ मोहम्मदच्या या टिप्पणीनंतर आता त्यावर टीका होऊ लागली आहे.