पीटीआय, कराची

भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा पाकिस्तान क्रिकेट संघाचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तान सरकारने रविवारी पाकिस्तान संघास स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मान्यता दिली. अर्थात, पाकिस्तान संघाच्या सुरक्षेविषयी काही प्रश्न असून, त्या विषयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कल्पना देण्यात आली आहे.

भारत आणि पाकिस्तान देशांमधील अतंर्गत संबंध लक्षात घेता पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आमचा सहभाग सरकारच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे स्पष्ट केले होते. याच कारणास्तव भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान रंगणार असून, सर्वाधिक आकर्षण असणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे रंगणार आहे. पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार हा सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार होता. नवरात्री उत्सवामुळे गुजरात सरकारने त्या दिवशी पूर्ण क्षमतेने सुरक्षा व्यवस्था पुरविण्यास असर्थता दर्शविली होती. अर्थात, या बदलास अजून ‘आयसीसी’कडून अधिकृत मान्यता मिळालेली नाही.

खेळ आणि राजकारणाची सरमिसळ करू नये हीच आमची भूमिका आहे आणि कायम राहिल. हा विचार करूनच आम्ही पाकिस्तान संघाला भारतात एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास मान्यता दिल्याचे पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. भविष्यात भारतासोबत असलेल्या द्विपक्षीय संबंधाची स्थिती आंतरराष्ट्रीय क्रीडा संबंधित जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या मार्गात कधीच येऊ नयेत असे आम्हाला वाटते, असेही निवेदनात म्हटले आहे.

पाकिस्तान संघाच्या सुरक्षेविषयी आम्हाला निश्चित काळजी आहे. आम्ही ही काळजी ‘आयसीसी’ आणि ‘बीसीसीआय’समोर व्यक्त केली आहे.पाकिस्तान संघाला संपूर्ण सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येईल अशी आम्ही अपेक्षा करतो, असा उल्लेखही करण्यात आला आहे. भारताने आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न येण्याच्या निर्णयावर टिप्पणी करताना यातून भारताची अविचारी वृत्ती दिसून येते अशी टीका केली आहे. पाकिस्तान संघ सात वर्षांनी भारतात क्रिकेट खेळण्यासाठी येणार आहे. यापूर्वी २०१६ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात आला होता.