सिडनी : कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत साकारलेल्या अर्धशतकांच्या बळावर पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडचा सात गडी आणि पाच चेंडू राखून पराभव करत तिसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या धीम्या खेळपट्टीवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला २० षटकांत ४ बाद १५२ धावांवर रोखले. मग हे लक्ष्य १९.१ षटकांत गाठत पाकिस्तानने तब्बल १३ वर्षांनंतर ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  डावाच्या तिसऱ्याच चेंडूवर शाहीन शाह आफ्रिदीने फिन अ‍ॅलनला (४)  पायचीत पकडले. त्यानंतर डेव्हॉन कॉन्वे (२० चेंडूंत २१) आणि विल्यम्सन (४२ चेंडूंत ४६) यांनी सावध फलंदाजी केली. मात्र, अखेरच्या षटकांत डॅरेल मिचेलने (३५ चेंडूंत नाबाद ५३) फटकेबाजी करत न्यूझीलंडला १५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. 

प्रत्युत्तरात रिझवान (४३ चेंडूंत ५७) आणि बाबर (४२ चेंडूंत ५३) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. तसेच न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांकडूनही त्यांना मदत मिळाली. न्यूझीलंडने बाबरचे झेल सोडले. त्यामुळे या दोघांनीही स्पर्धेतील पहिली अर्धशतके साकारली. युवा मोहम्मद हॅरिसनेही (२६ चेंडूंत ३०) योगदान देत पाकिस्तानला जिंकवले.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : २० षटकांत ४ बाद १५२ (डॅरेल मिचेल नाबाद ५३, केन विल्यम्सन ४६; शाहीन शाह आफ्रिदी २/२४) पराभूत वि. पाकिस्तान : १९.१ षटकांत ३ बाद १५३ (मोहम्मद रिझवान ५७, बाबर आझम ५३, मोहम्मद हॅरिस ३०; ट्रेंट बोल्ट २/३३)

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी या सामन्यात १०५ धावांची सलामी दिली. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धामधील ही त्यांची तिसरी शतकी भागीदारी ठरली. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकांमध्ये सर्वाधिक शतकी भागीदाऱ्यांचा विक्रम त्यांनी आपल्या नावे केला आहे.