पाकिस्तानची पराभवाची मालिका टी२० प्रकारातरी कायम आहे. रावळपिंडी इथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात पाकिस्तानचा ५५ धावांनी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

पाकिस्तानने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रिझा हेन्ड्रिंक्सने ४० चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ६० धावांची दिमाखदार खेळी साकारली. टोनी द झोरीने ३३ धावा करत त्याला चांगली साथ दिली. जॉर्ज लिंडने २२ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारांसह ३६ धावांची उपयुक्त खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने १९४ धावांचा डोंगर उभारला. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाझने ३ विकेट्स पटकावल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना साहिबजादा फरहान आणि सईम अय्युब यांनी चांगली सुरुवात केली मात्र ही जोडी फुटताच पुढच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती स्वीकारली. सईमने ३७ धावा केल्या. मोहम्मद नवाझने ३६ धावा करत प्रतिकाराचा प्रयत्न केला मात्र तो अपुराच ठरला. पाकिस्तानचा डाव १३९ धावांतच आटोपला. कार्बिन बॉशने ४ तर जॉर्ज लिंडने ३ विकेट्स पटकावल्या. टी२० संघात पुनरागमन केलेला माजी कर्णधार बाबर आझम भोपळाही फोडू शकला नाही. कर्णधार सलमान अघाही दोनच धावा करू शकला.

दक्षिण आफ्रिकेने या मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. आफ्रिकेचा अनुनभवी संघ असूनही पाकिस्तानला घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेने पहिली कसोटी गमावली मात्र दुसऱ्या टेस्टमध्ये त्यांनी पुनरागमन करत मालिका १-१ अशी बरोबरीत राखली.