कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या ॲशेस कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्याला मुकणार आहे. पर्थ येथे २१ नोव्हेंबरपासून होणाऱ्या या सामन्यात कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल. जायबंदी कमिन्स जुलैपासून मैदानाबाहेर आहे.
‘‘पहिल्या कसोटीपूर्वी कमिन्स तंदुरुस्त होण्याबाबत आम्ही आशावादी होतो. त्याला तंदुरुस्त होण्यासाठी चार आठवड्यांहून अधिकचा कालावधी लागेल याचे संकेत आम्हाला याआधीच मिळाले होते. तरीही आम्ही आशा राखली होती, परंतु आता तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल हे स्पष्ट झाले आहे. तो दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करेल असा आम्हाला विश्वास आहे,’’ असे ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्रयू मॅकडॉनल्ड यांनी सांगितले. पाच सामन्यांच्या या मालिकेतील दुसरा सामना ४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे रंगणार आहे.
‘‘या आठवड्यात कमिन्स गोलंदाजीला सुरुवात करेल. तो दुसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. तो संघासह पर्थला जाईल आणि तेव्हा आम्हाला त्याच्या तंदुरुस्तीचे योग्य आकलनही करता येईल,’’ असे मॅकडॉनल्ड यांनी सांगितले. स्मिथने २०२१ पासून कमिन्सच्या अनुपस्थितीत सहा वेळा ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे.
‘‘स्मिथकडे आम्ही कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. तो अनुभवी कर्णधार असून संघाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे,’’ असे मॅकडॉनल्ड म्हणाले. कमिन्सच्या अनुपस्थितीत स्कॉट बोलँडला अंतिम ११ खेळाडूंत संधी मिळणे अपेक्षित आहे. पर्थच्या अतिरिक्त उसळी असणाऱ्या खेळपट्टीवर बोलँड, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांची भूमिका ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची ठरेल.
