लाहोर : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील अपयशानंतरही पाकिस्तानच्या निवड समितीने एकदिवसीय संघात मोठे बदल करणे टाळले असले, तरी ट्वेन्टी-२० संघात युवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या अनुभवी फलंदाजांना ट्वेन्टी-२० संघातून डच्चू देण्यात आला आहे.
उदयोन्मुख अष्टपैलू सलमान अली आघा याची ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. अनुभवी लेग-स्पिनर शादाब खानचेही पाकिस्तान संघात पुनरागमन झाले असून त्याला उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. मायदेशात झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतरही एकदिवसीय संघाचे नेतृत्व रिझवानकडे कायम ठेवण्यात आले आहे.
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठीच्या संघातील फलंदाज सौद शकील आणि कामरान घुलाम, तसेच वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रौफ यांना मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वगळण्यात आले आहे.
पाकिस्तानचा संघ १६ मार्चपासून न्यूझीलंडमध्ये पाच ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
पाकिस्तान संघ
● एकदिवसीय : मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आघा (उपकर्णधार), अब्दुल्ला शफिक, बाबर आझम, अबरार अहमद, अकिफ जावेद, फहीम अश्रफ, इमाम उल हक, खुशदिल शाह, मोहम्मद अली, मोहम्मद वसीम ज्युनियर, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सुफियान मुकीम, तय्यब ताहीर.
● ट्वेन्टी-२० : सलमान अली आघा (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, हारिस रौफ, हसन नवाज, जहांदाद खान, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद हारिस, मोहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मुकीम, उस्मान खान.
© The Indian Express (P) Ltd