जम्मू काश्मीरात आयोजित एका खाजगी लीगसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना बोलावण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात भलतंच चित्र समोर आलं आहे. हॉटेलचं बिलही न भरता लीगच्या आयोजकांनी पोबारा केल्याचं स्पष्ट झालं आहे. आयोजक गायब झाल्याने खेळाडू, अंपायर्स, सामनाधिकारी यांना नेमकं कुणाला गाठायचं असा प्रश्न पडला आहे.
द इंडियन हेवन्स प्रीमिअर लीगचं आयोजन काश्मीरात करण्यात आलं आहे. यामध्ये ८ संघ आहेत. संघांमध्ये ख्रिस गेल, थिसारा परेरा, जेसी रायडर,डेव्हेन स्मिथ यासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. २५ ऑक्टोबर सुरू झालेली ही स्पर्धा ८ नोव्हेंबरला संपणार आहे. पण त्याआधीच हा प्रकार उघड झाला आहे.
शनिवारी सकाळी खेळाडूंना कळवण्यात आलं की तांत्रिक कारणांमुळे सामना रद्द करण्यात आला आहे. रविवारी सकाळी हॉटेलच्या स्टाफने खेळाडू, अंपायर-सामनाधिकारी यांना आयोजक हॉटेल सोडून गेल्याचं सांगितलं. हॉटेलचं बिल आयोजकांनी भरलं नसल्याचंही स्टाफने खेळाडूंना सांगितलं. आयोजकांनी पलायन केल्यामुळे दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न खेळाडूंना पडला.
हॉटेल मॅनेजमेंटने आम्हाला सकाळी याबाबत सांगितलं असं इंग्लिश क्रिकेट बोर्डाचे प्रतिनिधी मेलिसा ज्युनिपर यांनी सांगितलं. ज्युनिपर या लीगमध्ये अंपायर म्हणून कार्यरत आहेत. आम्हाला मानधन मिळालेलं नाही असं त्यांनी सांगितलं.
युवा सोसायटी मोहाली यांच्यातर्फे या लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांच्या वेबसाईटवर या लीगची माहिती देण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये खेळ, युवा आणि पर्यटनाचा मिलाफ साधणारी लीग असं वर्णन करण्यात आलं आहे. मनोरंजन, संधी आणि संस्कृतीचा हा अनोखा मेळ असेल असं संयोजकांनी म्हटलं आहे.
लीगमध्ये अंपायर म्हणून काम करणाऱ्या प्रतिनिधीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की तीन खेळाडूंना आणण्याचं काम मी केलं. यामध्ये डेव्हेन स्मिथ, क्रेग विलियम्स आणि गॅरे मथुरिन यांचा समावेश आहे. घडलेला प्रकार लीगसाठी चांगला नाही. श्रीनगर आणि भारतासाठीही चांगला नाही
लीगमध्ये काहीतरी गडबड आहे हे लक्षात आल्यानंतर बरेच खेळाडू काश्मीरमधून परतले असं लीगमध्ये सहभागी झालेल्या एका खेळाडूने सांगितलं. जम्मू अँड काश्मीर स्पोर्ट्स काऊंसिलने या लीगशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आम्ही लीगसाठी मैदान उपलब्ध करून दिले, बाकी आमचा काहीही संबंध नाही.
संयोजकांशी संपर्क साधला असता, त्यांचे फोन स्विच ऑफ आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
