भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधील महात्मा गांधी-नेल्सन मंडेला फ्रीडम चषक हा खेळपट्टय़ांमुळे अशांत पाहायला मिळाला. पहिल्या दिवसापासून खेळपट्टीवरील उकरणारी माती, हातभर वळणारे चेंडू आणि त्यावर नाचणारे फलंदाज, हेच चित्र कसोटी मालिकेत पाहायला मिळाले. या मालिकेत खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा जास्त चर्चा खेळपट्टीचीच झाली. पण ही मालिका भारताला बरेच काही शिकवूनही गेली.
फिरकी गोलंदाजी हे भारताचे नेहमीच बलस्थान राहिलेले आहे. त्यामुळे भारतात खेळताना फिरकीला पोषक खेळपट्टी बनणार, हे ओघाने आलेच. त्यामुळे या खेळपट्टय़ांवर पहिल्या दिवसापासून चेंडू वळायला लागल्यावर, आश्चर्य वाटायला नको, असे जाणकार, माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट पंडित असलेल्या सुनील गावस्कर यांनी मांडलेले मत भुवया उंचावणारे होते. या खेळपट्टय़ांमुळे फिरकीपटूंना कुरण मिळाले असले तरी फलंदाजांची ही अग्निपरीक्षाच होती. त्यामध्ये फार कमी फलंदाज तावूनसुलाखून निघाले. भारताकडून अजिंक्य रहाणे आणि आफ्रिकेकडून ए. बी. डी’व्हिलियर्स यांची या मालिकेतील फलंदाजी प्रेक्षणीय होती. भारताचा विचार केला, तर हा संघ ट्वेन्टी-२०च्या मुशीत वाढलेला. पण स्थानिक सामन्यांमध्ये अजिंक्यने गाळलेला घाम या वेळी फायद्याचा ठरला. फिरोजशाह कोटलाच्या नाजूक खेळपट्टीवर त्याने दोन्ही डावांत शतके झळकावली. या दोन्ही खेळी तंत्रशुद्ध फलंदाजीचा उत्तम वस्तुपाठ होत्या. या मालिकेत सर्वाधिक २६६ धावा त्याच्याच नावावर आहेत. पण संघातील दुसरा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजाराला मात्र लौकिकाला साजेशी फलंदाजी करण्यात अपयश आले. या मालिकेत त्याच्या सहभागाबद्दल संदिग्धता होती, तरीही त्याला संधी दिली. पण याचा फायदा त्याला उचलता आला नाही. छोटेखानी खेळ्या साकारत त्याने मालिकेत २०२ धावा केल्या. कदाचित त्याला अजूनही काही वेळ देण्याची निश्चित गरज आहे. सलामीवीर मुरली विजयनेही मालिकेत २१० धावा करत आपले स्थान बळकट केले, पण दुसरा सलामीवीर शिखर धवन मात्र सातत्याने अपयशी होताना दिसला. विराट कोहलीची फलंदाजीही फुलली नसली तरी मालिकेत त्याने २०० धावा केल्या. क्रिकेटच्या प्रकारानुसार खेळाचे तंत्र बदलण्यात रोहित शर्मा सपशेल अपयशी ठरला. ट्वेन्टी-२० किंवा एकदिवसीय क्रिकेटसारखी त्याला या कसोटी मालिकेत छाप पाडता आली नाही. या गुणवान खेळाडूला संयमाचे महत्त्व पटण्याची गरज आहे.
पोषक परिस्थिती असणे आणि त्याचा योग्य फायदा उचलणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, त्या प्रत्येकालाच जमतात असे नाही. पण या मालिकेत संधीचे सोने कसे करायचे हे आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी दाखवून दिले. अश्विनने तर फलंदाजांसाठी परतीचा मार्ग अधिक व्यापक बनवला. प्रत्येक सामन्यामध्ये त्याने आफ्रिकेच्या फलंदाजांना भंडावून सोडले. मालिकेत तब्बल ३१ बळी, १०१ धावा अशी नेत्रदीपक कामगिरी करत त्याने मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला. जडेजा पहिल्यांदा या मालिकेत फिरकीपटू वाटला. कारण संघाला गरज असताना तो संघासाठी धावून येत होता. या मालिकेतील त्याचे २३ बळी भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे ठरले. डी’व्हिलियर्स हा अभिजात फलंदाज आहे. त्याची वानखेडेवरील एकदिवसीय सामन्यातली खेळी एका बाजूला आणि कसोटी मालिकेतील फलंदाजी दुसऱ्या बाजूला. जो फलंदाज आक्रमकतेची दुधारी तलवार घेऊन गोलंदाजांना लोटांगण घालायला लावतो, तोच उत्तम बचावही करू शकतो, हे पाहणे आनंददायी होते. आफ्रिकेकडून तो एकमेव फलंदाज होता की, ज्याला सातत्याने धावा करता आल्या. या मालिकेत त्याने २५८ धावा केल्या. पण दुसऱ्या बाजूला संघातील संयमी फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हशिम अमलाला मात्र चांगली फलंदाजी करता आली नाही. या मालिकेत त्याला फक्त ११८ धावा करता आल्या, तर जीन-पॉल डय़ुमिनीलाही ७० धावाच करता आल्या. आफ्रिकेची गोलंदाजी ही मुख्यत्वे करून वेगवान माऱ्यावर अवलंबून होती. त्यामध्येच दुखापतींचा ससेमिराही त्यांचा पाठलाग करत होता. पण इम्रान ताहिरसारख्या फिरकीपटूला मालिकेत फक्त १४ बळी मिळणे, ही पचनी पडणारी गोष्ट नक्कीच नाही. त्यापेक्षा सायमन हार्मरने दोन सामन्यांमध्येच दहा बळी मिळवण्याची किमया साधली होती.
मालिका खेळताना चर्चेवर लक्ष द्यायचे नसते. हे नवख्या भारताच्या कसोटी कर्णधाराला समजायला हवे. प्रत्येक गोष्ट आक्रमकतेने किंवा भाष्य करून सुटत नसतात. त्याला आक्रमकपणा दाखवायचाच होता तर तो त्याने मौनातून आणि फलंदाजीतून दाखवायचा होता. रवी शास्त्री गुरुजींनीही कामगिरीकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांच्या बोलण्याने हा विषय अधिक चघळला गेला आणि मालिकेतील कामगिरीचीच चर्चा कमी झाली. ही मालिका जिंकली असली तरी हा विजय मोठा वाटला नाही, तसे जाणवलेही नाही. कारण चर्चा झाली खेळपट्टीची. आफ्रिका हरली तरी त्यांच्यावर टीकेची झोड नाही. भारताचे कौतुक नाही. विदेशात यजमानांकडून असे होत नाही, कारण त्यांना कशावर काय बोलायचे हे चांगले माहिती असते. त्यांचे लक्ष हे कामगिरी कशी होते, त्यामध्ये कशी सुधारणा करता येईल, यावर जास्त असते. तेच भारतीयांनीही शिकण्याची गरज आहे, तरच भारताची कामगिरी अधिक प्रकाशझोतात येऊ शकते. एकंदरीत या मालिकेत गोंधळच जास्त पाहायला मिळाला. तो काही वेळा फलंदाजांच्या बाद होण्याचा होता, काही वेळा वळणाऱ्या चेंडूंचा, तर काही वेळा शाब्दिक युद्धांचा. त्यामुळे साराच गोंधळ होता, पण चर्चा मात्र झाली ती खेळपट्टीचीच!
prasad.lad@expressindia.com