Prithvi Shaw Will Play For MCA: भारताचा आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळालेली नाही. भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून देणाऱ्या पृथ्वी शॉ ला खरी ओळख मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिली. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हिरवं कंदिल दाखवत त्याला जाण्यास होकार दिला. आता येणाऱ्या हंगामात तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं प्रतिनिधित्व करणार आहे.

ज्यावेळी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती, त्यावेळी त्याने केवळ चांगली ऑफर आल्याचं सांगितलं होतं. मुंबईची साथ सोडल्यानंतर तो कोणत्या संघाकडून खेळणार, हे त्याने उघडपणे सांगितलं नव्हतं. मात्र, आगामी रणजी हंगामात तो महाराष्ट्राकडून खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पोस्ट शेअर करत याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणार

ऋतुराज गायकवाड हा महाराष्ट्राचा कर्णधार आहे. त्यामुळे पृथ्वी शॉ आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. पुण्यातील गाहुंजे स्टेडियम हे आता पृथ्वी शॉ चं नवं होम ग्राऊंड असणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत अंकित बावणे अनेकदा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना दिसून आला आहे. आता पृथ्वी शॉ सारखा अनुभवी खेळाडू आल्याने महाराष्ट्राचा टॉप ऑर्डर आणखी भक्कम होणार आहे. ऋतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ दोघेही डावाची सुरूवात करताना दिसतील.

काय म्हणाला होता पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ ने मुंबई क्रिकेट असोसिएशनला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, “ कारकिर्दीतील या वळणावर मला दुसऱ्या राज्याकडून क्रिकेट खेळण्याची ऑफर मिळाली आहे. मला विश्वास आहे की, या निर्णयामुळे मी क्रिकेटपटू म्हणून प्रगती करु शकेल. त्यामुळे मी विनंती करतो की, मला आगामी हंगामात इतर राज्याच्या असोसिएशनचं प्रतिनिधित्व करता यावं त्यासाठी तुम्ही एनओसी द्यावी.”