दक्षिण अफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकच्या घरात एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. पुढच्या वर्षी क्विंटनची पत्नी साशा डी कॉक तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. क्विंटनने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यात तो पत्नीसोबत दिसत असून त्याने फोटोला ‘बेबी डी कॉक जानेवारी २०२२मध्ये येणार आहे’ असे कॅप्शन दिले आहे.

क्विंटन आणि साशा यांनी जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६मध्ये मॉरीशस येथे लग्न केले. क्विंटन डी कॉक हा आयपीएलमधील यशस्वी फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सचा स्टार सलामीवीर आहे. तो रोहित शर्मासोबत सलामीला येतो. मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादव आणि दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू वेन पार्नेल, मॉर्ने मॉर्कल यांच्यासह इतर क्रिकेटपटूंनी क्विंटनचे अभिनंदन केले.

 

हेही वाचा – माजी मंत्री बनला क्रिकेट ‘कोच’..! व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत करणार काम

२८ वर्षीय क्विंटन डी कॉक आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी असणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचा भाग आहे. ही मालिका ११ जुलैपासून डब्लिनमध्ये सुरू होणार आहे. उभय संघांत तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल.