Rahul Dravid on Rohit Sharma Captaincy: रोहित शर्माचं नेतृत्त्व आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२५ चं जेतेपद पटकावलं होतं. रोहित आणि राहुलच्या जोडीने त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी केली होती. टी-२० विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा भारताचे प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला. तर रोहितने देखील भारताच्या टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. आता राहुल द्रविड यांनी रोहित शर्माचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केलं आहे. द्रविड यांनी नोव्हेंबर २०२१ ते जून २०२४ पर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. या काळात रोहित शर्मा बहुतेक वेळा कर्णधार होता. दोघांनी मिळून भारताला अनेक मोठे विजय मिळवून दिले. २०२३ मध्ये भारताने सलग १० सामने जिंकून एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर २०२४ मध्ये भारताने ११ वर्षांनी आयसीसी ट्रॉफी जिंकली.
रविचंद्रन अश्विनचा युट्युब शो कुट्टी स्टोरीजमध्ये राहुल द्रविड यांनी उपस्थिती लावली होती. यादरम्यान त्यांनी रोहित शर्माचं नेतृत्त्व त्याचा स्वभाव आणि संघाप्रति असलेलं त्याचं प्रेम यावर वक्तव्य केलं आहे.
रोहितबरोबर काम करताना कसं वाटलं? द्रविड म्हणाले…
माजी प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, “रोहितबरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान होता. रोहितबाबत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला संघाबद्दल खूप आपुलकी, काळजी असायची आणि तो याबाबत अगदी स्पष्ट होता. पहिल्या दिवसापासूनच त्याने संघ कसा चालवायचा आणि त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे अगदी स्पष्ट केलं होतं. कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या नात्यात ही स्पष्टता खूप महत्त्वाची असते, विशेषतः माझ्या प्रशिक्षण पद्धतीनुसार.”
द्रविड म्हणाले की कर्णधार म्हणून रोहितला पाठिंबा देणं हेच त्यांचं प्रमुख काम होतं, “मला नेहमीच असं वाटतं की संघ हा कर्णधाराचा असायला हवा. मी स्वतः खेळाडू राहिलो आहे, कर्णधारही राहिलो आहे, पण कर्णधाराने कोणत्या दिशेने जायचं हे ठरवायचं असतं आणि प्रशिक्षकाने त्याला त्यात साथ द्यायची आणि मदत करायची असते.”
“कधीकधी कर्णधाराला काही गोष्टींची स्पष्टता मिळावी, काय आवश्यक आहे हे नीट समजावं यासाठी प्रशिक्षकाने मदत करावी लागते. पण रोहितबाबत तसं काहीच नव्हतं. त्याला संघाकडून काय अपेक्षित आहे, वातावरण कसं असावं, ड्रेसिंग रूममध्ये काय माहोल असला पाहिजे, गोष्टी कशा चालाव्यात, या सर्व गोष्टींची सुरूवातीपासूनच त्याला स्पष्टता होती. अनेक वर्षांचा अनुभव त्याच्याकडे होता आणि त्याचा खूप फायदा झाला,” असं द्रविड यांनी सांगितलं.
रोहितला व्यक्ती म्हणून जाणून घेण्यात आनंद मिळाला – राहुल द्रविड
क्रिकेटपेक्षा जास्त रोहितला व्यक्ती म्हणून जाणून घेण्यात राहुल द्रविड यांना आनंद मिळाला. रोहितच्या स्वभावाबद्दल बोलताना द्रविड म्हणाले, “मला रोहितला व्यक्ती म्हणून जवळून ओळखण्यात खूप आनंद झाला. फक्त क्रिकेटविषयी नव्हे, तर अनेक इतर गोष्टींवर त्याच्याशी गप्पा मारताना छान वाटायचं. गप्पा मारताना, वावरताना कधीही कुठली जबरदस्ती वाटली नाही. नेहमीच खूप छान आणि सहज असायचं.”