Ravindra Jadeja KL Rahul Teases Shubman Gill Video: भारतीय संघ सध्या इंग्लंडबरोबर तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळत आहे. भारताने एजबेस्टनमधील दुसरा सामना जिंकत इतिहास घडवला होता. भारताने ५८ वर्षांत प्रथमच एजबेस्टनमध्ये कसोटी सामना जिंकला होता. यानंतर तिसरा कसोटी सामना होईपर्यंत ब्रेक होता. यादरम्यान संपूर्ण संघ आणि अनेक दिग्गज क्रिकेटपटू एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. यादरम्यानचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गिलला जडेजा आणि राहुल चिडवत होते.

दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यादरम्यान भारतीय संघाने माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंगच्या ‘YouWeCan’ फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी पोहोचला होता. हा कार्यक्रम लंडनमध्ये होता. युवराज सिंग फाऊंडेशनसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने लंडनमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक माजी खेळाडूंसह टीम इंडियाचे सदस्यही सहभागी झाले होते. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रवींद्र जडेजा कदाचित कसोटी कर्णधार शुबमन गिलची मजा घेताना दिसतो आहे.

कार्यक्रमादरम्यान भारतीय खेळाडू एका टेबलावर बसलेले होते. यात रवींद्र जडेजा, शुबमन गिल, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि केएल राहुल होते. याचवेळी थोडं दूर उजव्या बाजूला सचिन तेंडुलकर पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरबरोबर उपस्थित होता. जडेजाने जेव्हा उजवीकडे पाहिलं, तेव्हा त्याचं लक्ष तेंडुलकर कुटुंबाकडे गेलं. यादरम्यान स्टेजवरही सचिन तेंडुलकरला बोलावण्यासाठी निवेदन सुरू होतं.

सचिन तेंडुलकरचं नाव येताच जडेजाने प्रथम सचिनच्या दिशेने पाहिलं आणि तो पुन्हा गिलची चेष्टा करताना दिसला. तर केएल राहुलदेखील त्या दोघांच्या मध्ये बसला होता आणि त्याला चिडवताना दिसला. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून चाहत्यांनी अंदाज लावला की गिलला हे दोघंही सारा तेंडुलकरच्या नावाने चिडवत आहेत. दरम्यान शुबमन गिलचा चेहरा दिसला नाही, पण तो एकदम खुलून हसत आहे; जणू काही लाजत असल्याचं दिसत आहे. तर जडेजा चिडवत असल्याचे पाहताच मागून ऋषभ पंतने त्याच्या पाठीत फटका मारला आणि लगेच जडेजा वळला. सचिन तेंडुलकर स्टेजवर जाताच सर्वजण टाळ्या वाजवू लागले.

शुबमन गिलचं नाव सारा तेंडुलकरबरोबर अनेक वेळा जोडलं गेलं आहे. त्यांच्या डेटिंगबाबतही चर्चा होत असते. मात्र, ना गिलने ना साराने याबद्दल कधीही काही स्पष्टपणे सांगितलं नाही. काही दिवसांपूर्वी गिलने ‘सिंगल’ असल्याचंही सांगितलं होतं. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सारा तेंडुलकर बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसह एका ठिकाणी दिसली होती. त्यानंतर गिल आणि साराचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे, हे फक्त सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल सांगू शकतात.