Ravindra Jadeja Chris Woakes Video Viral: बर्मिंगहम कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा आणि शुबमन गिल यांनी द्विशतकी भागीदारी करत इंग्लंडच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. जडेजा आणि गिल दोघेही चांगला डिफेंन्स करत प्रसंगी मोठे फटके खेळत होते. इंग्लंडच्या गोलंदाजांकडून ही जोडी फोडणं कठिण झालं होतं. यादरम्यान इंग्लंडचे खेळाडू माईंडगेम्स खेळताना दिसले आणि सातत्याने जडेजाबरोबर पिचबाबत चर्चा करत होते. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
रवींद्र जडेजा ८९ धावांवर झेलबाद झाला आणि त्याचं शतक हुकलं. शुभमन गिल मात्र मैदानावर कायम राहत त्याने द्विशतक झळकावलं. गिल आणि जडेजा यांच्यात २०३ धावांची भागीदारी झाली होती जी शेवटी जोश टंगने तोडली. पण यापूर्वी मैदानावर नेमकी काय चर्चा सुरू होती, जाणून घेऊया.
रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही खेळाडू खेळपट्टीबद्दल बोलताना दिसले. खरंतर, रवींद्र जडेजाच्या शूजमुळे खेळपट्टी खराब होत होती. तेव्हा वोक्स त्याला खेळपट्टीकडे बोट दाखवत त्याने पिच खराब केल्याचं दाखवत होता. यादरम्यान इंग्लंडच्या गोलंदाजांना पिचकडून काहीच मदत मिळत नव्हती.
जडेजाने खेळपट्टीकडे बोट दाखवत म्हटलं, “मी इथून आलो.” यावर वोक्स म्हणाला, खेळपट्टीची काय अवस्था केलीये बघ तू. यानंतर जडेजा म्हणाला, मी तिथे बॉलिंगच करणार नाहीये, काळजी नको करू. यानंतर काही वेळाने परत स्टोक्स पंचांना सांगत पिचजवळ घेऊन आला. जडेजाशी परत चर्चा करताना दिसलाय स्टोक्स आणि इंग्लंडचे माईंडगेम्स सातत्याने सुरू होते. यावर जडेजाने पण जबरदस्त उत्तर दिलं.
स्टोक्स आणि पंच बोलत असताना जडेजा म्हणाला, “मी असं का करेन, माझं पूर्ण लक्ष फलंदाजीवर आहे.” वरूण एरोन या संपूर्ण प्रकरणावर कॉमेंट्री करताना म्हणाला, “इंग्लंड विनाकारण माईंडगेम्स खेळतंय. जडेजाने असे अनेक माईंडगेम्स खेळले आहेत.” इंग्लंडला दुसऱ्या दिवशी खेळपट्टीकडून बिलकुल मदत मिळत नव्हती. ज्यामुळे इंग्लंडचे गोलंदाज बरेच शॉर्ट बॉल टाकण्याचं प्लॅनिंग करत होते. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.