WPL 2025 RCB vs GG Highlights in Marathi: वुमन्स प्रीमियर लीग २०२५ ला आजपासून सुरूवात झाली आहे. पहिलाच सामना गतवर्षीचा चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि गुजरात जायंट्स यांच्यात होता. यंदाच्या वुमन्स प्रीमियर लीगचा पहिलाच सामना ऐतिहासिक ठरला आहे. यंदाच्या स्पर्धेत सुरूवातीपासूनच रेकॉर्ड्स होण्याला सुरूवात झाली आहे. आरसीबीने पहिल्याच सामन्यात गुजरात संघाचा ६ विकेट्सने आणि ९ धावा राखून विजय मिळवला. या विजयासह आरसीबी संघाने इतिहास घडवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचे आरसीबीने पहिल्या १० षटकांत सिद्ध केले. पण बेथ मुनी आणि अॅश्ले गार्डनर यांनी संघाला २०० अधिक धावांचा टप्पा गाठण्यात मदत केली. बेथ मुनीने ४२ चेंडूत ८ चौकारांसह ५६ धावा केल्या. तर गुजरात संघाची कर्णधार अॅश्ले गार्डनरने ३७ चेंडूत ८ षटकार आणि ३ चौकारांसह ७९ धावांची वादळी खेळी केली. यासह गुजरातने पहिल्याच सामन्यात ५ विकेट्स गमावत २०१ धावांची खेळी केली. आरसीबीकडून रेणुका सिंगने २ विकेट्स घेतल्या. तर कनिका अहुजा, जॉर्जिया वेयरहम आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

आरसीबीचा गुजरातवर ऐतिहासिक विजय!

यानंतर २०२ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अॅश्ले गार्डनरने सुरूवातीच्या षटकांमध्ये दोन्ही सलामीवीरांना बाद करत संघाला मोठा धक्के दिले. पण आरसीबी याने डगमगला नाही. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने ३४ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांसह ५७ धावांची शानदार खेळी केली. तर राघवी बिश्तने २५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. सायली सातघरेने पेरीला तर डिएंड्रा डोटिनने राघवीला बाद करत चांगली भागदारी तोडली.

पण यानंतर आलेल्या रिचा घोष आणि कनिका अहुजा यांनी गियर बदलत उत्कृष्ट कामगिरी करत ९३ धावांची धमाकेदारी खेळी करत अशक्य विजय संघाला मिळवून दिला. पहिल्याच सामन्याची सामनावीर ठरलेली रिचा घोष हिने २७ चेंडूत ४ षटकार आणि ७ चौकारांसह ६४ धावांची जबरदस्त खेळी केली आणि विजयी षटकारासह संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. गुजरात संघाला त्यांच्या खराब फिल्डींगचा मोठा फटका दिसला आहे. संघाने एलिसा पेरीला ३ वेळा झेलबाद करण्याची संधी गमावली. तर रिचा घोष पहिल्याच चेंडूवर सीमारेषेवर मोठा फटका खेळताना झेलबाज होणार होती, पण संघाने तो झेलही सोडला आणि रिचाने वादळी खेळी करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासात आरसीबीचा संघ सर्वात मोठ्या धावसंख्येचं लक्ष्य गाठणारा पहिला संघ ठरला आहे. आरसीबीने १० चेंडू शिल्लक ठेवत २०२ धावांचे विजयी लक्ष्य गाठले. यापूर्वी ही कामगिरी मुंबई इंडियन्सच्या नावे होती. ज्यांनी गतवर्षी गुजरातविरूद्धच १९१ धावांचे विजय लक्ष्य गाठले होते.

WPL मध्ये सर्वोच्च लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणारे संघ

२०२ – RCB वि. GG, वडोदरा, २०२५*
१९१ – MI वि. GG, दिल्ली, २०२४
१८९ – RCB वि. GG, ब्रेबॉर्न, २०२३
१७९ – UPW वि. GG, ब्रेबॉर्न, २०२३
१७२ – MI वि. DC, बेंगळुरू, २०२४

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcb beat gg by 6 wickets with highest target successfully chased in the history of wpl richa ghosh wpl2025 bdg