वर्ल्डकप विजयानंतर भारतीय महिला संघातील खेळाडूंवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. अनेक राज्य सरकारांनी रोख बक्षीस देऊन या खेळाडूंना गौरवलं आहे. काहींनी जमीन तर काहींनी नोकरी देऊन सन्मान केला आहे. मा ऋचा घोषच्या बाबत अपवाद आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ऋचा घोषचं नाव दार्जिंलिंगमधल्या एका मैदानाला देण्यात येणार असल्याची घोषणा केली. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, लिटील मास्टर सुनील गावस्कर, भारताला दोन वर्ल्डकप मिळवून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या नशिबी जे भाग्य नाही ते ऋचाला मिळणार आहे. सचिन तसंच रोहित यांचं नाव मैदानातल्या स्टँडला देण्यात आलं आहे. मात्र अख्ख्या स्टेडियमला यांचं नाव देण्यात आलेलं नाही. ऋचाला हा बहुमान मिळणार आहे. महिला क्रिकेटपटूचं नाव स्टेडियमला देण्यात येणार असल्याची ही भारतातली ही पहिलीच वेळ असणार आहे.

पश्चिम बंगाल सरकारतर्फे आयोजित सत्कार समारंभात ममतादीदी बोलत होत्या. या कार्यक्रमाला दिग्गज महिला क्रिकेटपटू झूलन गोस्वामी यांच्यासह भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली हे उपस्थित होते. यावेळी ममतादीदी म्हणाल्या, दार्जिलिंगमध्ये २७ एकरचा भूखंड यासाठी मुक्रर करण्यात आला आहे. याठिकाणी क्रिकेट स्टेडियम उभारण्यासंदर्भात दार्जिंलिंगच्या महापौरांना सूचना देण्यात आल्या आहेत. या स्टेडियमला ऋचाचं नाव देण्यात येणार आहे. ऋचा क्रिकेट स्टेडियम असं याचं नाव असेल. भावी पिढ्या ऋच्याच्या कामगिरीतून दखल घेतील.

या कार्यक्रमात ऋचाला सुवर्णांकित बॅट आणि बॉल देऊन गौरवण्यात आलं. यावर सौरव गांगुली आणि झूलन गोस्वामी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. वर्ल्डकपविजयासह बंगालचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महान खेळाडूंच्या यादीत ऋचाचा समावेश झाला आहे. पश्चिम बंगाल सरकारने ऋचाला बंगभूषण पुरस्कार देऊन गौरवलं. याअंतर्गत तिला सोन्याची माळ देण्यात आली. पोलीस दलात ऋचाची डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस यापदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ल्डकप स्पर्धेतली कौतुकास्पद कामगिरी आणि युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान या दृष्टिकोनातून ऋचाला हा पुरस्कार देण्यात आला. ऋचा भारताची भविष्यातली कर्णधार असेल असं सौरव गांगुली यांनी सांगितलं.

दार्जिलिंग स्टेडियम आकारास आल्यास केवळ महिला क्रिकेट नव्हे तर भारतीय क्रिकेटसाठी तो मैलाचा दगड ठरले. मिताली राजच्या नावे विशाखापट्टणम इथे तर झूलन गोस्वामीच्या नावे कोलकाता इथल्या स्टेडियममधल्या स्टँडला नाव देण्यात आलं आहे. पण संपूर्ण स्टेडियम महिला क्रिकेटपटूचं नाव देण्याची ही पहिलीच वेळ असेल. सिलीगुडीची ऋचाने देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केल्याने तिच्या गौरवार्थ स्टेडियमला नाव देण्यात येणार आहे.