बंगळूरु : भारतीयांना विराट कोहलीला ट्वेन्टी-२० संघातून कसे बाहेर ठेवता येईल, याची कारणे शोधायला का आवडते हेच मला कळत नाही. माझ्या मते, कोहलीला पर्याय नाहीच. मी भारतीय संघाची निवड करत असतो तर त्यात प्रथम कोहलीला स्थान दिले असते, असे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग म्हणाला.

कोहलीने यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून साखळी फेरीत ७०० धावांचा टप्पा ओलांडणारा तो एकमेव फलंदाज आहे. कोहलीच्या ‘स्ट्राइक रेट’वर अनेकदा टीका झाली आहे. यंदा मात्र तो अधिक आक्रमकपणे खेळताना दिसत आहे. त्यामुळे कोहलीवर सतत प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे पॉन्टिंगला वाटते.

‘‘भारतीय संघासाठी मी सर्वप्रथम कोहलीचीच निवड करेन. तो फार उच्च दर्जाचा खेळाडू असून त्याच्या गाठीशी खूप अनुभवही आहे. त्यामुळे कोहलीला पर्याय नाहीच. अन्य कोणताही खेळाडू त्याची जागा घेऊ शकत नाही,’’ असे पॉन्टिंग म्हणाला.

हेही वाचा >>>IPL 2024: रडतखडत का होईना, राजस्थानचा आरसीबीवर विजय; क्वालिफायरमध्ये हैदराबादशी गाठ

‘‘भारतातील बरेच लोक कोहलीला ट्वेन्टी-२० संघातून बाहेर ठेवण्यासाठी किंवा तो अन्य काही खेळाडूंच्या तुलनेत कसा चांगला नाही, हे दाखवण्यासाठी विविध कारणे शोधत असतात. मला हे अतिशय हास्यास्पद वाटते. कोहलीसारखा खेळाडू तुम्हाला सहजासहजी सापडू शकणार नाही,’’ असे कोहलीच्या टीकाकारांना पॉन्टिंगने सुनावले. तसेच अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात कर्णधार रोहित शर्मासह कोहली सलामीला येईल असे पॉन्टिंगला वाटते.

‘‘माझ्या मते, कोहली आणि रोहित भारताच्या डावाची सुरुवात करतील. कोहली खेळपट्टीवर टिकल्यास दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार यादव आणि रोहितसारख्या फलंदाजांना अधिक आक्रमकपणे खेळता येऊ शकेल,’’ असेही पॉन्टिंगने म्हटले आहे.