Rishabh Pant Smashes Helmet in Anger IND vs ENG: भारतीय संघाने एजबेस्टन कसोटीच्या पहिल्या दिवशी आपला दबदबा कायम राखला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने भारतीय संघ फलंदाजीला उतरला. टीम इंडियाने यासह पहिल्या दिवशी फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावले आणि ३१० धावा केल्या आहेत. शुबमन गिलने चांगली फलंदाजी करत शतक झळकावलं. यादरम्यान दुसऱ्या सत्रात ऋषभ पंत विचित्र पद्धतीने बाद झाला आणि त्याने बाद झाल्यावर हेल्मेटवर राग काढला.

ऋषभ पंत करूण नायर बाद झाल्यानंतर फलंदाजीला उतरला. करूणने चांगली सुरूवात केली पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. करूण ३१ धावा करत माघारी परतला. यानंतर गिल आणि पंतने संघाचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत इंग्लंडच्या गोलंदाजांविरूद्ध चांगली फलंदाजी करत आहे.

दरम्यान ऋषभ पंत त्याच्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो, त्याप्रमाणे तो खेळत होता. शोएब बशीरच्या गोलंदाजीवर त्याने पहिल्या कसोटीतही शानदार फटके खेळले होते. तर दुसऱ्या कसोटीतही त्याने तीच रणनिती कायम ठेवली. पंतने सामन्यातील पहिला षटकार शोएबच्या गोलंदाजीवर खेचला. पंत जसा त्याच्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो, त्याचप्रमाणे तो असे विचित्र फटके खेळत बादही होतो आणि या सामन्यातही तो तसाच बाद झाला.

शोएब बशीर ६१व्या षटकात पुन्हा गोलंदाजीला आला. फिरकीपटू शोएब गोलंदाजीला आल्याचे पाहताच ऋषभ पंतने मोठा फटका खेळण्यासाठी बॅट फिरवली. पंतने मोठा फटका खेळला होता, पण चेंडू सीमारेषेच्या आत होता. त्या ठिकाणी कोणता फिल्डर तैनात केलेला नव्हता. पण चेंडू त्या दिशेने येत आहे पाहून क्रॉली धावत तिथे पोहोचला आणि अचूक झेल टिपला. यासह पंत बशीरच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला.

ऋषभ पंतने मोठा फटका खेळण्याच्या नादात स्वत:च्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतली आणि झेलबाद झाला. यानंतर पंत निराश होत पॅव्हेलियनच्या दिशेने परतला. ड्रेसिंग रूमच्या पायऱ्या चढल्यानंतर त्याने हातातील हेल्मेट तिथे असलेल्या खुर्चीवर आदळलं आणि आपला राग व्यक्त केला. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात ऋषभ पंतने शतक झळकावत मोठा विक्रम केला होता. पंत हा अँडी फ्लॉवर यांच्यानंतर कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतक करणारा फक्त दुसरा यष्टीरक्षक फलंदाज ठरला. दुसऱ्या डावात पंत ४२ चेंडूत १ चौकार आणि एका षटकारासह २५ धावा करत बाद झाला.