India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना बर्मिंघमच्या मैदानावर रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवासह इंग्लंडने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना २ जुलैपासून सुरू होणार आहे. दरम्यान या सामन्यात ऋषभ पंतकडे एजबस्टनच्या मैदानावरील विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.
हा सामना एजबस्टनच्या मैदानावर रंगणार आहे. एजबस्टनच्या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावावर आहे. मात्र, या सामन्यात ऋषभ पंत विराटला मागे सोडू शकतो. विराट कोहलीच्या नावे एजबस्टनच्या मैदानावर खेळताना २ कसोटी सामन्यांमध्ये ५७.७५ च्या सरासरीने २३१ धावा करण्याची नोंद आहे. विराट हा एजबस्टनच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. तर भारताचे लिटिल मास्टर सुनील गावस्कर या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत.
सुनील गावस्कर यांच्या नावे एजबस्टनमध्ये २१६ धावा करण्याची नोंद आहे. ऋषभ पंतच्या नावे या मैदानावर फलंदाजी करताना २०३ धावा करण्याची नोंद आहे. त्यामुळे जर ऋषभ पंतने दुसऱ्या कसोटी सामन्यात २९ धावा केल्या, तर या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये तो विराट कोहली आणि सुनील गावस्करांना मागे सोडू शकतो. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चौथ्या स्थानी आहे. सचिनने बर्घिंघममध्ये खेळताना १८७ धावा केल्या आहेत. तर या यादीत पाचव्या स्थानी असलेल्या गुंडप्पा विश्वनाथ यांच्या नावे एजबस्टनच्या मैदानावर फलंदाजी करताना १७२ धावा करण्याची नोंद आहे.
एजबस्टनच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
विराट कोहली- २३१ धावा
सुनील गावस्कर- २१६ धावा
ऋषभ पंत- २०३ धावा
सचिन तेंडुलकर- १८७ धावा
गुंडप्पा विश्वनाथ -१८२ धावा
पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात शतकं
या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऋषभ पंतने दमदार शतकी खेळी केली. या डावात त्याने १७८ चेंडूंचा सामना करत १३४ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावांचा डोंगर उभारला. तर दुसऱ्या डावात भारतीय संघाला ३६४ धावा करता आल्या. या डावातही ऋषभची बॅट चांगलीच तळपली. त्याने १४० चेंडूंचा सामना करत ११८ धावांची खेळी केली.