Rohit Sharma Loose 10 kg Weight: भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेल्या रोहितने आपल्या फिटनेसवर आणि फलंदाजीवर प्रचंड मेहनत घेतली आहे. तो आपला बालपणीचा मित्र आणि प्रशिक्षक अभिषेक नायरसोबत मिळून सराव करत आहे. यासह जिममध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी घाम गाळत आहे. दरम्यान अभिषेक नायरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे.

रोहित शर्माने कमी केलं १० किलो वजन

रोहित शर्माला आपल्या फिटनेसमुळे नेहमी ट्रोल केलं जायचं. एकीकडे विराट आणि दुसरीकडे रोहित शर्मा अशी तुलना केली जायची. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहितने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. रोहितने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेऊन १० किलो वजन कमी केलं आहे. अभिषेक नायरने रोहित शर्मासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर कॅप्शन म्हणून त्याने, ‘१०००० ग्रॅम कमी केल्यानंतर आम्ही आणखी मेहनत घेऊ..’ असं लिहिलं आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रोहित आधीपेक्षा आणखी फिट असल्याचं दिसून येत आहे. रोहित येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पुनरागमन करताना दिसून येऊ शकतो. रोहितला २०२७ चा वर्ल्डकप खेळायचा आहे. त्यामुळे त्याने स्वतःला फिट ठेवणं खूप गरजेचं आहे.

रोहित शर्माने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होण्याआधी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तर टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला होता. येत्या काही दिवसात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर तो पुनरागमन करताना दिसेल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेनंतर तो भारतीय संघासाठी एकही सामना खेळताना दिसून आलेला नाही. पण तो कर्णधार म्हणून खेळणार की कर्णधारपद बदललं जाणार याबात निर्णय घेतला जाणार आहे.