Rohit Sharma statement on Champions Trophy win: रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघासाठी गेल्या दोन आयसीसी स्पर्धा फार संस्मरणीय ठरल्या. माजी कोच राहुल द्रविड आणि रोहित शर्माच्या जोडीच्या नेतृत्त्वाखील टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद आपल्या नावे केले. त्यानंतर लगेच चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले, यावेळेस संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर होते. रोहितने नुकत्याच एका कार्यक्रमात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाबद्दल बोलताना गंभीरचा उल्लेखही न करता माजी कोच राहुल द्रविडबाबत वक्तव्य केलं आहे.

रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेपूर्वी संघाच्या कर्णधारपदावरून हटवत शुबमन गिलला संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी दिली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळताना दिसणार आहेत. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित प्रथमच एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला होता.

रोहित शर्मा नुकताच सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्ससाठी उपस्थित आहे. या कार्यक्रमात रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे विजेत्या संघाचा कर्णधार म्हणून खास पुरस्कार देण्यात आला. यादरम्यान तो ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेबाबत आणि त्या संघाविरूद्ध खेळण्याबाबत त्याने सांगितलं. तर यादरम्यान त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळताना संघाची विचारसरणी आणि संघाबरोबर खेळताना कसं वाटलं याबाबत सांगितलं.

रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाबाबत बोलताना द्रविडचा उल्लेख करत कोच गंभीरला वगळलं

रोहित शर्मा म्हणाला, “चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा भाग असलेल्या सर्व खेळाडूंनी सामने कसे जिंकायचे, स्वतःला आव्हान कसे द्यायचे, याचा विचार केला. शिवाय, त्यांनी कधीही काहीही गृहीत धरलं नाही. आम्ही टी-२० विश्वचषकाची तयारी करत असताना राहुल भाई (माजी कोच राहुल द्रविड) आणि मला या प्रक्रियेमुळे आणि विचारसणीची खूप मदत झाली. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही हीच विचारसरणी कायम ठेवली.”

विजेत्या संघाबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “मला तो संघ आणि त्यांच्याबरोबर खेळताना खूप आनंद मिळतो. आम्ही सर्वजण अनेक वर्षांपासून एकत्र खेळतोय. हे एक-दोन वर्षांचं काम नव्हतं. हा एक दीर्घकालीन प्रयत्न होता. आम्ही २०२३ मध्ये ट्रॉफी जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचलो पण ते शक्य झालं नाही. तेव्हाच सर्वांनी ठरवलं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्याकडे पाहण्याचे दोन मार्ग आहेत, एखादी गोष्ट करण्याचा विचार करणं आणि प्रत्यक्षात ती गोष्ट अंमलात आणणं. हे एक किंवा दोन खेळाडू करू शकत नव्हते. आम्हाला सर्वांनी ही विचारसरणी स्वीकारण्याची गरज होती आणि सर्वांनीच याप्रमाणे काम केलं.”

रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाकडून एकही सामना खेळलेला नाही. रोहित आता जवळजवळ सात महिन्यांनंतर पुन्हा मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची भारताच्या एकदिवसीय संघात निवड झाली आहे.