IND vs ENG ODI Series Rohit Sharma Press Conference: उद्यापासून म्हणजेच ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भारत वि इंग्लंड वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ही मालिका फारच महत्त्वाची असणार आहे. शिवाय रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर या मालिकेत सर्वांच्या नजरा असणार आहेत. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी पोहोचला होता, यादरम्यान रोहित शर्मा पत्रकारांच्या एका प्रश्नावर चांगलाच संतापला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर सामन्यापूर्वीच भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी रोहितला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्याबद्दल विचारण्यात आले. त्यामुळे रोहित वैतागलेला दिसला. रोहित शर्माने पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्याबाबत बोलण्यास नकार दिला.

रोहित शर्माला बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याच्या क्रिकेटमधील भविष्याबद्दल माहिती देण्यास सांगितले असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. यादरम्यान पत्रकार परिषदेत रोहितला त्याच्या भविष्यातील योजनांबाबत विचारलं असता तो म्हणाला, “जेव्हा तीन एकदिवसीय सामने आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे, तेव्हा माझ्या भविष्यातील योजनांबद्दल बोलणं कितपत योग्य आहे. माझ्या भवितव्याबद्दल अनेक वर्षांपासून वेगवेगळे रिपोर्ट्स समोर आले आहेत आणि त्या अहवालांवर स्पष्टीकरण देण्यासाठी मी इथे आलेलो नाही. माझ्यासाठी तीन सामने आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खूप महत्त्वाची आहे. माझं लक्ष या सामन्यांवर आहे आणि यानंतर काय होईल ते पाहता येईल.”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगण्यास सांगितले आहे. त्याचवेळी रोहितला आगामी सामन्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. रोहित म्हणाला, “हा एक वेगळा फॉरमॅट आहे. क्रिकेटपटू म्हणून असे चढ-उतार येत असतात आणि मी माझ्या कारकिर्दीत अशा अनेक गोष्टींचा सामना केला आहे. हे माझ्यासाठी काही नवीन नाही. आम्हाला माहित आहे की प्रत्येक दिवस हा नवीन असतो, प्रत्येक मालिका ही नवीन मालिका असते. भूतकाळात काय घडलं, यावर लक्ष केंद्रित न करता मी नव्या आव्हानाची वाट पाहत आहे. मागे वळून पाहण्याचं काही कारण नाही. पुढे काय होणार आहे आणि माझ्यासाठी पुढे काय ठेवलं आहे यावर मी लक्ष केंद्रित करणं महत्वाचे आहे. ही मालिका चांगल्या पद्धतीने सुरू करण्याचा माझा प्रयत्न असेल.”

भारत वि इंग्लंड वनडे मालिकेसाठी दोन्ही भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma got angry in press conference over question of his future ahead ind vs eng odi series and champions trophy bdg