Mohammad Kaif On Rohit Sharma : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या दौऱ्यासाठी युवा फलंदाज शुबमन गिलची वनडे संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. विराट आणि रोहित संघाचा भाग असणार आहेत. पण दोघांसमोर चांगली कामगिरी करून संघात स्थान टिकवण्याचं आव्हान देखील असणार आहे. दरम्यान भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने विराट आणि रोहितबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दोघे केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहेत. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील अंतिम सामना झाल्यानंतर विराट आणि रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तर इंग्लंड दौऱ्याआधी दोघांनीही इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून निवृत्तीची घोषणा केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर दोघांनाही फार क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयपीएलनंतर पहिल्यांदाच दोन्ही फलंदाज मैदानात उतरणार आहे. त्यामुळे दोघांवरही दबाव असेल, यात काहीच शंका नाही.

आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला, “लोकं म्हणत आहे की, विराटच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. पण हे रोहितसाठीही लागू होतं. रोहित आता कर्णधार नाही. गेल्या काही वर्षांत तो २०-३० धावांची खेळी करतोय आणि मोठा सामना येतो तेव्हा ८० धावांची सामना जिंकवणारी खेळी करतो. त्याची कारकिर्द अशीच पुढे सरकली आहे. तो सातत्याने धावा करू शकलेला नाही.”

जर विराट- रोहितची जोडी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत धावा करण्यात अपयशी ठरली, तर काय? या प्रश्नाचं उत्तर देताना मोहम्मद कैफ म्हणाला, “जर दोघेही या मालिकेत फ्लॉप ठरले, तर काय होणार? लोकं म्हणतील, दोघंही फॉर्ममध्ये नाहीत. पण तुम्ही जर दोघांची कारकिर्द पाहिली, तर दोघेही नेहमी २-३ डावात अपयशी ठरले आहेत. त्यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन केलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतही त्याने सुरूवातीला ३०-४० धावा केल्या, त्यानंतर अंतिम सामन्यात त्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.”

कैफच्या मते, वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत विराट आणि रोहितसारखे अनुभवी खेळाडू संघात असायला हवेत. जर हे दोघेही वर्ल्डकप स्पर्धा खेळणार असतील, तर ही भारतीय संघासाठी अभिमानाची बाब असेल. दोघेही भारतीय संघासाठी महत्वपूर्ण खेळी करू शकतात. केवळ २-४ डावातील कामगिरीच्या आधारे कुठलाही निर्णय घेऊ नका, असं मोहम्मद कैफचं म्हणणं आहे.