Sachin Tendulkar, BCCI President: भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर हा बीसीसीआयचा पुढील अध्यक्ष होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान सचिनने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने आपल्या निवेदनातून, या सर्व अफवा आहेत आणि सचिन तेंडुलकर यांचा काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने स्पष्टीकरण देत म्हटले की, ” भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआयच्या) अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकरच्या नावाचा विचार किंवा नामांकन करण्याबाबत काही वृ्त्ते आणि अफवा पसरवल्या जात असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. आम्ही सर्वांना या अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करतो.”
बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून ऑक्टोबर २०२२ मध्ये रॉजर बिन्नी यांची निवड करण्यात आली होती. पण बीसीसीआयच्या नियमानुसार वयाची ७० वर्ष ओलांडल्यानंतर या पदावर कार्यरत राहता येत नाही. त्यामुळे बीसीसीआय नव्या अध्यक्षांच्या शोधात आहे. येत्या २८ सप्टेंबरला बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत याबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याचं म्हटलं जाणार आहे. या निवडणुकीत बीसीसीआय अध्यक्षांसह बोर्डाच्या इतर सदस्यांची देखील निवड केली जाणार आहे.
जय शाहा यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाची सुत्रे सांभाळल्यानंतर देवजीत सैकिया यांनी जय शाहा यांची जागा घेतली. बिन्नी यांची ऑक्टोबर २०२२ मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आता या पदासाठी कोणाची निवड होणार? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. दरम्यान सचिन तेंडुलकर या शर्यतीत नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
सचिन तेंडुलकर हा भारताच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं झळकावण्याची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने २०० सामन्यांमध्ये १५९२१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५१ शतकं आणि ६८ अर्धशतकं झळकावली आहेत. तर वनडे क्रिकेटमधील ४६३ सामन्यांमध्ये त्याने १८४२६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४९ शतकं आणि ९६ अर्धशतकं झळकावली आहेत.