Sachin Tendulkar Special Post for Teachers Day: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि त्याचे गुरू रमाकांत आचरेकर यांचं नातं सर्वश्रुत आहे. आचरेकर सरांनी केलेले संस्कार, त्याला दिलेली शिकवण याचे दर्शन मैदानावर आणि मैदानाबाहेरही सचिनच्या कृतीतून वारंवार घडत असते. देशभरात आज ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातोय. या पार्श्वभूमीवर सचिनने त्याच्या जीवनात आणि क्रिकेटच्या प्रवासात त्याला कायम मार्गदर्शन करणाऱ्या ३ शिक्षकांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

भारतात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन (Teachers’ Day) साजरा केला जातो. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंचे आभार मानतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. याच निमित्ताने भारताचा माजी खेळाडू ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यानेही आपले गुरु दिवंगत रमाकांत आचरेकर सर, त्याचे वडिल रमेश तेंडुलकर आणि भाऊ अजित तेंडुलकर यांचे आभार मानले आहेत.

सचिन तेंडुलकरच्या शिक्षक दिनाच्या पोस्टच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

सचिनच्या आयुष्यात त्याच्या कुटुंबाचे विशेषतः त्याचे बाबा रमेश तेंडुलकर आणि भाऊ अजित तेंडुलकर यांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. भाऊ अजितने सचिनच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याची क्रिकेटशी ओळख करून देणारी व्यक्ती म्हणजे त्याचा भाऊ अजित. तेच सचिनला रमाकांत आचरेकर सरांकडे घेऊन गेले होते.

वडिलांनी आणि भावाने दिलेले धडे अजूनही सचिन विसरलेला नाही. त्याच्या यशामध्ये या दोघांचा मोलाचा वाटा आहे आणि आजच्या दिवशीच त्याने रमाकांत आचरेकर सरांबरोबर भाऊ अजित आणि वडिलांप्रति देखील कृतज्ञता व्यक्त केली. यांच्या मार्गदर्शनामुळेच क्रिकेटर म्हणून नाही तर एक नम्र आणि विनयशील व्यक्ती म्हणूनही सचिन लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान ठरतो.

सचिन तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने वडिलांबरोबरचा पहिला फोटो शेअर केला आहे. दुसरा फोटो प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांबरोबरचा आहे. तर तिसरा फोटो त्याने भाऊ अजित यांच्याबरोबर शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सचिनने लिहिलं, “एक नाणं, एक किट बॅग आणि तीन आधार देणारे हात – माझे वडील, आचरेकर सर आणि अजित यांच्यापासून माझा प्रवास सुरू झाला. यासाठी मी सदैव कृतज्ञ आहे.”

सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी दिलेली शिकवण

तुझ्या आयुष्यात तू क्रिकेटची निवड केलीस तरी हरकत नाही. अखेर माणूस म्हणून तू कसा आहेस हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, असं सचिनचे वडील तो लहान असताना त्याला सांगायचे.

सचिन तेंडुलकरच्या प्रशिक्षकांनी दिलेली शिकवण

केवळ क्रिकेटमधील स्ट्रेट ड्राईव्हच नव्हे, तर आयुष्यातदेखील कोणतीही लबाडी न करता सरळ मार्गाने कसे वागले पाहिजे हे मला आचरेकर सरांनी शिकवले असे सचिनने एका व्हीडिओमध्ये म्हटलं होतं.