Sai Sudarshan Half Century, IND vs ENG 4th Test: संधीचं सोनं करणं काय असतं हे साई सुदर्शनने दाखवून दिलं आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल गाजवल्यानंतर साई सुदर्शनला भारतीय संघात स्थान मिळालं. पहिल्या कसोटीत त्याला संघात स्थान मिळालं. पण पदार्पणात फ्लॉप राहिल्यानंतर त्याला बाहेर करण्यात आलं होतं. आता करुण नायरला संघातून वगळल्यानंतर साई सुदर्शनला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळालं. या संधीचं सोनं त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली.
साई सुदर्शनचं दमदार अर्धशतक
या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं. हे आमंत्रण स्वीकारून भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलची जोडी मैदानावर आली. या जोडीने भारताला दमदार सुरुवात करून दिली. केएल राहुल ४६ धावा करत तंबूत परतला. तर यशस्वी जैस्वालने दमदार अर्धशतकी खेळी केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ९४ धावा जोडल्या. त्यानंतर केएल राहुल माघारी परतला.
भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. त्यानंतर साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. चांगली सुरुवात मिळाल्यामुळे साई सुदर्शनला सेट होण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. त्याने याचा फायदा घेत जैस्वालसोबत मिळून आणि त्यानंतर ऋषभ पंतसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. दरम्यान या डावात त्याने ६१ धावांची दमदार खेळी केली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक ठरलं.
करुण नायरला संधी मिळणार का?
या मालिकेतील सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये करुण नायरला संधी दिली गेली होती. मात्र, त्याला या संधीचा फायदा घेता आलेला नाही. मालिकेतील तिन्ही सामन्यात त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. त्याला चांगली सुरुवात मिळत होती. मात्र, त्या सुरुवातीचं मोठ्या खेळीत रूपांतर करता येत नव्हतं. अखेर चौथ्या कसोटीत त्याला बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता साई सुदर्शनने अर्धशतक झळकावल्यानंतर करुण नायरला पुनरागमन करण्याची संधी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण करूण नायरला त्रिशतकी खेळी केल्यानंतर एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही.