Sai Sudharsan Test Debut on Special Day IND vs ENG: भारताचा युवा क्रिकेटपटू साई सुदर्शनला इंग्लंडविरूद्ध पहिल्याच कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या साईचा उत्कृष्ट फॉर्म पाहता तो पहिल्याच कसोटीत विराट कोहलीच्या जागी खेळणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिल्या सामन्यात, कर्णधार शुभमन गिल नाणेफेकीसाठी आला तेव्हा साई सुदर्शन या सामन्यात पदार्पण करत असल्याची माहिती दिली.

साई सुदर्शनने आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी करत सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. आयपीएल २०२५ ची ऑरेंज कॅपही साई सुदर्शनने जिंकली. त्याने १५ सामन्यांमध्ये ५४.२१ च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक ७५९ धावा केल्या. त्याच्या या उत्कृष्ट फॉर्मनंतर त्याची भारतीय संघात निवड झाली आणि आता तो कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे.

साई सुदर्शनला चेतेश्वर पुजाराने पहिल्या कसोटीच्या नाणेफेकीपूर्वी कसोटी पदार्पणाची कॅप सोपवली. विशेष म्हणजे साई सुदर्शनने खास तारखेला कसोटी पदार्पण केले आहे. याआधी ज्या खेळाडूंनी या दिवशी पदार्पण केले आहे ते भारतीय क्रिकेटचे मोठे स्टार खेळाडू बनले आहेत.

साई सुदर्शनने आज म्हणजेच २० जून रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ही तारीख खूपच खास आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २० जून १९९६ रोजी राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी एकत्र कसोटी पदार्पण केले होते. हा सामनाही इंग्लंडविरुद्ध खेळला गेला होता. त्यानंतर २० जून २०११ रोजी विराट कोहलीने पदार्पण केले. विशेष म्हणजे २० जून रोजी पदार्पण करणाऱ्या या तिन्ही खेळाडूंनी १०० हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. तसेच, तिघांनीही आपापल्या काळात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.

आता साई सुदर्शननेही योगायोगाने याच तारखेला कसोटी पदार्पण केलं आहे.आता साई आपल्या कामगिरीने सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्या यादीत सामील झाल्यानंतर त्यांच्याप्रमाणे कामगिरी करणार का यावर सर्वांचं लक्ष असेल. साई सुदर्शनने आतापर्यंत २९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये त्याने १९५७ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३९.९३ आहे. यादरम्यान साई सुदर्शनने ७ शतकं आणि ५ अर्धशतकं केली आहेत.