न्यू हेवन खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारत सानिया मिर्झाने शिरपेचात मानाचा तुरा खोवला. दुहेरी प्रकारातील सानियाची ही रौप्यमहोत्सवी अंतिम लढत असून, यापैकी १६ लढतींत तिने जेतेपदावर कब्जा केला आहे. नवीन साथीदार चीनच्या जी झेंगच्या साथीने खेळताना सानियाने अंतिम फेरीत आगेकूच केली.
तृतीय मानांकित सानिया-झेंग जोडीने स्पेनच्या सिल्व्हिया सोलर-इस्पिनोसा-कार्ला सुआरेझ जोडीवर ६-३, ६-३ अशी मात केली. लिझेल ह्य़ुबेर-नुरिया लागोस्टेरा व्हाइव्हस आणि अनाबेल मेडिना गॅरिग्युस-कतरिना स्त्रेबोटनिक यांच्यातील विजेत्या जोडीशी सानिया-झेंग जोडीचा मुकाबला होणार आहे. यंदाच्या हंगामात अंतिम फेरीत खेळण्याची सानियाची ही चौथी वेळ आहे. सानियाने यंदाच्या हंगामात दोन जेतेपदांची कमाई केली आहे. अमेरिकेच्या बेथानी मॅटेक सँण्ड्सच्या साथीने खेळताना सानियाने ही जेतेपदे पटकावली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza reaches 25th doubles final of career