Sanju Samson Century In KCL: येत्या काही दिवसात आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. या संघात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा देखील समावेश करण्यात आला आहे. पण संजू सॅमसनला संधी मिळणार की नाही, यावर शंका आहे. गिलला उपकर्णधार म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणार हे निश्चित आहे. दरम्यान संजूला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणार नसल्याची चर्चा रंगली होती. आता संजूने केरळ क्रिकेट लीग स्पर्धेत फलंदाजी करताना वादळी शतकी खेळी केली आहे. यासह भारतीय संघात प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचं दाखवून दिलं आहे.
केरळ क्रिकेट लीग स्पर्धेला सुरूवात झाली आहे. संजू सॅमसन या स्पर्धेत कोच्ची ब्लू टायगर्स संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. संजू या सामन्यात डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आला. यादरम्यान त्याने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आधी १६ चेंडूत त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर ४२ चेंडूत वादळी शतक पूर्ण केलं.
याआधी खेळताना तो मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी आला होता. पण त्याला आपली छाप सोडता आली नव्हती. मात्र, आपल्या मूळ जागी परतताच त्याने शतक झळकावलं आणि दाखवून दिलं की सलामीवीर म्हणून तो सर्वोत्तम आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या एरिज कोल्लम संघाने २० षटकांअखेर २३६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोच्ची संघाने पावरप्लेच्या षटकांमध्ये १ गडी बाद १०० धावांचा पल्ला गाठला.
ही केरळ प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे कोच्ची संघाला सामना जिंकण्यासाठी इतिहास घडवायचा होता. या डोंगराइतक्या धावांचा पाठलाग करताना संजूने ४२ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने १४ चौकार आणि ७ षटकार मारले. संघाला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवून तो १९ व्या षटकात बाद होऊन माघारी परतला. शेवटच्या षटकात कोच्ची संघाने धावांचा यशस्वी पाठलाग करत ४ गडी बाद राखून विजयाची नोंद केली.