Sarfaraz Khan Century: बुची बाबू क्रिकेट लीग स्पर्धेत मुंबईचा फलंदाज सरफराज खानची बॅट चांगलीच तळपली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दमदार शतकी खेळी केल्यानंतर आता हरियाणाविरूद्ध खेळतानाही त्याने लागोपाठ दुसरं शतक झळकावलं आहे. सरफराज खान ज्यावेळी फलंदाजीला आला त्यावेळी मुंबईचा संघ अडचणीत होता. संघातील ३ प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते. मात्र, सरफराज खानने याचा दबाव न घेता हरियाणाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि ९९ चेंडूत दमदार शतक झळकावलं. या संपूर्ण डावात त्याने ११२ चेंडूंचा सामना करत १११ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ षटकार आणि ९ चौकार मारले.

सरफराज खानची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली होती. पण त्याला एकही सामन्यात खेळण्याची संधी दिली गेली नव्हती. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. या संघात मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी साई सुदर्शन आणि करूण नायर यांना स्थान दिलं गेलं होतं. आता सरफराजने लागोपाठ २ शतकं झळकावून निवडकर्त्यांना चोख प्रत्तुत्तर दिलं आहे. बुची बाबू स्पर्धा झाल्यानंतर दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतही सरफराजने चांगली कामगिरी केली, तर त्याला भारतीय संघात स्थान द्यावच लागेल.

इंग्लंड दौऱ्याआधी जेव्हा सर्व खेळाडू आयपीएल स्पर्धा खेळण्यात व्यस्त होते, त्यावेळी सरफराज खानने आपल्या फिटनेसव अधिक भर दिला. त्याने वजन कमी केलं. कसून सराव केला. मात्र, तरीही त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली नव्हती. इथून पुढे भारतीय संघ वेस्टइंडिजविरूद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतणार आहे. या मालिकेत सरफराज खानला संधी मिळू शकते. कारण भारतात खेळताना त्याने दमदार कामगिरी केली आहे.

सरफराज खानला २०२४ मध्ये भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. यादरम्यान त्याने ३७.१० च्या सरासरीने ३७१ धावा केल्या. ज्यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता. त्यानंतर न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या मालिकेतही त्याला स्थान दिलं गेलं होतं. पण त्यानंतर त्याला भारतीय संघासाठी एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. बॉर्डर- गावसकर ट्रॉफीसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं, पण एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत त्याला स्थान दिलं गेलं नव्हतं.