Saurabh Netravalkar LinkedIn Post: युनायटेड स्टेट्समध्ये सुरू असलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध यूएसए संघाने शानदार विजय मिळवत इतिहास रचलाय. या यशाचा शिल्पकार मुंबईत जन्मलेला भारतीय वंशाचा क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर हा ठरला. सामन्यानंतर लगेचच सौरभविषयी जाणून घेण्यासाठी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता वाढली होती. याच उत्सुकतेमध्ये काहींनी सौरभच्या लिंक्डइन प्रोफाइलचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आणि मग मॅच पेक्षा याच पोस्ट तुफान व्हायरल होऊ लागल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहे सौरभ नेत्रावळकर?

भारताच्या २०१० मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील वर्ल्डकप संघात सौरभ तो केएल राहुल, हर्षल पटेलसारख्या खेळाडूंसह खेळला होता. यानंतर मुंबईकडून रणजी ट्रॉफीही तो खेळला आहे. शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेला सौरभ आता थेट अमेरिकेच्या क्रिकेट संघाचा हुकुमी एक्का ठरला आहे. येत्या दिवसांमध्ये भारताच्याच विरुद्ध सौरभ मैदानात दिसणार आहे. जन्मभूमी विरुद्ध कर्मभूमी ही लढत देणार्या सौरभच्या जोरावर काल पाकिस्तान पराभूत झाल्याने आता सोशल मीडियावर तो हिरो ठरला आहे. ३२ वर्षीय नेत्रावळकरने गुरुवारी सुपर-ओव्हरमध्ये आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.

सौरभ नेत्रावळकर लिंक्डइन प्रोफाइल

सौरभ नेत्रावळकर हा मुळचा मुंबईचा असून तो इंजीनियर आहे. मुंबई विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) पदवी प्राप्त केल्यानंतर, नेत्रावळकर कॉर्नेल विद्यापीठातून संगणक विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत गेला होता. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, २०१६ मध्ये तो कॅलिफोर्नियामधील टेक जायंट ओरॅकलमध्ये जॉईन झाला. गेल्या आठ वर्षांपासून ओरॅकलमध्ये काम करत आहे. कालच्या सामन्यानंतर X युजर मुफद्दलाल वोहराने क्रिकेटरच्या लिंक्डइन प्रोफाइलचा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटले की, “सर्व क्रिकेटपटूंमध्ये सौरभ नेत्रावलकरची लिंक्डइन प्रोफाइल सर्वात छान आहे.” यानंतर ही पोस्ट सुद्धा खूप व्हायरल झाली होती.

ओरॅकल कंपनीतर्फे सुद्धा सौरभचा फोटो आणि लिंक्डइन प्रोफाईलचा स्क्रिनशॉट शेअर करत अभिनंदनाची पोस्ट करण्यात आली होती. कंपनीने आपल्या X खात्यावर लिहिले की, “यूएस क्रिकेट संघाचे ऐतिहासिक निकालासाठी अभिनंदन, आम्हाला टीमचा आणि आमचा इंजिनिअरिंग व क्रिकेटस्टार सौरभ नेत्रावळकर याचा खूप अभिमान आहे.”

हे ही वाचा<< USA vs PAK Highlights: शोएब अख्तरने लाज काढली, “पाकिस्तान विजय मिळवूच शकत नव्हता, कारण..”

या पोस्ट शेअर करताना नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. त्यातील एक कमेंट मात्र अनेकांना आवडलीये ती म्हणजे “सौरभ नेत्रावळकर – मित्रा कृपया तुझं लिंक्डइन डिलीट कर! माझे पालक त्या ॲपवर आहेत.” X युजरने सौरभच्या खेळ, काम व शिक्षणातील अष्टपैलू कामगिरीला बघून केलेल्या या कमेंटला अनेकांनी सहमती दर्शवली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saurabh netravalkar linkedin shocks netizens us vs pak t 20 world cup match highlights mumbai cricketer beats babar azam team svs