नवी दिल्ली : जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्याचा निर्णय आणि जबाबदारी अखेर भारतीय ऑलिम्पिक संघटना नियुक्त हंगामी समितीसच घ्यावी लागली. हंगामी समितीने जागतिक स्पर्धेसाठी २५ आणि २६ ऑगस्ट रोजी पतियाळात निवड चाचणी घेण्याचे जाहीर केले आणि त्याचवेळी चाचणी सर्वासाठी अनिवार्य असेल असेही स्पष्ट केले.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड चाचणी पार पाडल्यानंतर हंगामी समितीने जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीचा चेंडू भारतीय कुस्ती संघटनेच्या नव्या कार्यकारिणीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हरियाणा आणि पंजाब कुस्ती संघटनेने कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती मिळवल्याने हंगामी समितीला जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीबाबत निर्णय घ्यावाच लागला.आशियाई क्रीडा स्पर्धेतील कुस्ती स्पर्धा संपल्यावर साधारण १० दिवसांत जागतिक स्पर्धा होणार आहे. यामुळे सरावासाठी अपुरा वेळ लक्षात घेऊन विनेश व बजरंग यांनी चाचणीसाठी उपलब्ध असण्याविषयी अजून निर्णय घेतलेला नाही.