Babar Azam Resigns and Pakistan Team new Captain: पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळ सुरूच आहे. बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीकडे टी२० आणि शान मसूदकडे कसोटीचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर वन डे संघाच्या कर्णधाराबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पाकिस्तानला पुढचा वन डे सामना २०२४ मध्ये नोव्हेंबर महिन्यात खेळायचा आहे. यात अजून एक वर्ष बाकी आहे. याच कारणामुळे वन डे कर्णधाराची निवड झालेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमला कर्णधारपद सोडावे लागेल, असे मानले जात होते. तेव्हापासून कर्णधार म्हणून शाहीन आफ्रिदीचे नाव पुढे येत होते. या विश्वचषकात चांगली कामगिरी करणारा शाहीन हा एकमेव पाकिस्तानी खेळाडू होता. त्याने यापूर्वी पीएसएलमध्ये लाहोर कलंदर संघाचे नेतृत्व केले आहे आणि आपल्या संघाला चॅम्पियन बनवले आहे. अशा परिस्थितीत त्याला टी२०चा कर्णधार बनवणे हा योग्य निर्णय मानला जात आहे. मोहम्मद रिझवानही कर्णधारपदाच्या शर्यतीत सामील होता, मात्र त्याला ही जबाबदारी देण्यात आलेली नाही.

पाकिस्तानचा नवा कसोटी कर्णधार शान मसूद याचे नाव आधीपासून चर्चेत नव्हते, मात्र त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. ३४ वर्षीय मसूद हा डावखुरा फलंदाज असून त्याने पाकिस्तानसाठी ३० कसोटी सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने २८च्या सरासरीने १५९७ धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याचे कसोटी संघातील स्थान निश्चित झाले नव्हते, मात्र त्याच्याकडे अचानक संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

विश्वचषकापासून हा गोंधळ सुरू आहे

विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबरने कर्णधारपद सोडल्याची चर्चा होती. पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ आणि बाबर आझम यांच्यातही चर्चा होत नव्हती. यानंतर मुख्य निवडकर्ता इंझमाम-उल-हक यांनी स्पर्धेच्या मध्यभागी राजीनामा दिला. यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनीही राजीनामा दिला. त्यानंतर पीसीबीने संपूर्ण निवड समिती बरखास्त केली. आता मिकी आर्थरच्या नेतृत्वाखालील कोचिंग पॅनल बरखास्त केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: IND vs NZ: विराट कोहलीने न्यूझीलंड संघाच्या खेळाडूकडून घेतले पाणी, सामन्यादरम्यानचा Video व्हायरल

कर्णधार म्हणून बाबरचा विक्रम

बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने तिन्ही फॉरमॅटसह १३४ सामने खेळले आहेत. यामध्ये पाकिस्तानने ७८ सामने जिंकले, तर ४४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. एक सामना बरोबरीत राहिला, तर सात सामन्यांचा निकाल लागला नाही. बाबरने २०१९ मध्ये कर्णधारपदाची सुरुवात केली. कर्णधार म्हणून बाबरने तिन्ही फॉरमॅटसह १३४ सामन्यांच्या १४२ डावांमध्ये ४८.०३च्या सरासरीने ६२९२ धावा केल्या होत्या. यामध्ये १५ शतके आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaheen shah afridi has been given the captaincy of t20 and shan masood has been given the captaincy of test avw