वृत्तसंस्था, नवी दिल्ली
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा अनुभव आमच्यासाठी बहुमूल्य आहे. त्यामुळे एकदिवसीय विश्वचषकासाठी संघबांधणी करताना त्यांच्यासारख्या गुणवान खेळाडूंकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने स्पष्ट केले. अजित आगरकर यांच्या निवड समितीने २०२७ मध्ये आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीला आतापासूनच सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने ३८ वर्षीय रोहितच्या जागी २६ वर्षीय गिलकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. गिलने कसोटी संघाचा कर्णधार म्हणून चांगली सुरुवात केली असून आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही यशस्वी ठरण्याचा त्याचा मानस आहे. त्यासाठी अनुभवी खेळाडूंची साथ गरजेची असल्याचे गिलने नमूद केले आहे.
‘‘रोहितभाई आणि विराटभाई यांच्या गाठीशी मोठा अनुभव आहे. त्यांनी अनेक सामने खेळले असून भारताला अनेक सामने जिंकवूनही दिले आहेत. त्यांच्याइतके कौशल्य, प्रतिभा आणि अनुभव असलेले खेळाडू तुम्हाला भारतातच काय, तर जगभरातही सहजासहजी सापडणार नाहीत. त्यामुळे ते एकदिवसीय संघाचा भाग असल्याचा मला आनंदच आहे,’’ असे गिलने सांगितले.
विंडीजविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत गिलला या सामन्याइतकेच रोहित आणि विराट यांच्या भवितव्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर त्याने सकारात्मक उत्तरे दिली. रोहितकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले असले, तरी १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. कर्णधार म्हणून रोहितकडून खूप गोष्टी शिकल्या असून त्यांचा मला निश्चितपणे फायदा होईल असे गिल म्हणाला.
‘‘रोहितभाईकडे अनेक गुण आहेत, जे मला घ्यायला आवडतील. त्याचा विशेष गुण म्हणजे तो अतिशय शांत आहे. कितीही दडपण असले, तो संयमाने निर्णय घेतो. तसेच त्याने ड्रेसिंग रूममध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले. त्याचे सर्व खेळाडूंसह मैत्रीचे संबंध आहेत. मलाही या गोष्टी अमलात आणायला आवडतील,’’ असे गिलने सांगितले.
कसोटीला प्राधान्य महत्त्वाचे
वेस्ट इंडिजच्या संघाला पहिल्या कसोटीत भारताला झुंजही देता आली नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटसाठी ‘आयसीसी’च्या द्विस्तरीय रचनेच्या योजनेबाबत चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. यात केवळ आघाडीचे संघच एकमेकांविरुद्ध खेळतील आणि तुलनेने दुबळे संघ दुसऱ्या विभागात खेळतील असे नियोजन आहे. याबाबत शुभमन गिलला विचारण्यात आले. ‘‘कसोटीसाठी द्विस्तरीय रचना असायला हवी का, याबाबतचा निर्णय ‘आयसीसी’च घेऊ शकेल. मात्र, माझ्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्यासाठी संघ म्हणून तुमचा लाल चेंडूंच्या सामन्यांचा पाया पक्का असायला हवा. तुम्ही कसोटीला महत्त्व दिलेत आणि त्या दृष्टीनेच तुम्ही विचार केलात, तर तुम्हाला एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये यश मिळवणे सोपे जाते. मात्र, तुम्ही मर्यादित षटकांच्या क्रिकेटला अधिक महत्त्व देऊन त्यातून कसोटीपटू घडू शकतील असा विचार करत असाल, तर ते शक्य नाही. कसोटीला प्राधान्य देणे गरजेचे आहे,’’ असे गिलने नमूद केले.
भूतकाळाचा विचार करण्यापेक्षा मी वर्तमान आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यापूर्वी जे यश संपादन केले त्याचा आनंद आहेच. परंतु त्यापेक्षा आगामी काळात काय यश मिळवू शकतो याबाबत जास्त उत्सुकता आहे. तिन्ही प्रारूपांत खेळताना शारीरिकदृष्ट्या नाही, तर मानसिकदृष्ट्या थकवा जाणवू शकेल. हे निश्चितपणे आव्हान असेल, पण मी त्यासाठी सज्ज आहे. – शुभमन गिल