एकदिवसीय विश्वचषक २०२७ चा विचार करता रोहित शर्माच्या जागी नवा कर्णधार शुबमन गिलला वनडे संघांचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची संघात निवड केली आहे. पण भारताचे हे दोन्ही दिग्गज खेळाडू २०२७ चा वर्ल्डकप खेळणार की नाही याबाबत शंका आहे. दरम्यान भारताचा नवा वनडे कर्णधार शुबमन गिलने यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

२०२७ च्या विश्वचषकात विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळतील की नाही याबाबत शुभमन गिलने स्पष्ट केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोची सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत गिलने याबाबत वक्तव्य केलं. २०२७च्या वनडे वर्ल्डकपसाठी संघाच्या प्लॅनिंगबाबत त्याने माहिती दिली.

२०२७ च्या विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या क्षमतेबद्दलच्या प्रश्नावर शुबमन गिलने चर्चा केली. टीम इंडियाचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार शुबमन गिलने क्रिकेट चाहत्यांना आश्वासन दिलं आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहली २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक खेळण्याच्या शर्यतीत आहेत. गिलने या वक्तव्यासह जणू निवड समितीला इशारा दिला आहे की रोहित-विराटचा अनुभव आणि त्यांची वर्ल्डकपमधील उपस्थिती संघासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.

रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताच्या एकदिवसीय योजनांचा भाग आहेत, हे दोन्ही अनुभवी खेळाडू २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी शर्यतीत असल्याचं नव्या कर्णधाराने म्हटलं. गिल म्हणाला, रोहित आणि विराटसारखा अनुभव आणि प्रतिभा फार कमी खेळाडूंकडे असते. भारतासाठी फार कमी खेळाडूंनी इतके सामने जिंकून दिले आहेत. अशी प्रतिभा आणि अनुभव जगात फार कमी खेळाडूंकडे आहे, असं मला वाटतं. ते दोघेही २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याच्या शर्यतीत आहेत.”

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व नवा कर्णधार शुबमन गिल करेल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे अनुभवी भारतीय फलंदाज आता गिलच्या नेतृत्वाखाली खेळतील. शुबमन गिल म्हणाला की, तो रोहित शर्माप्रमाणे ड्रेसिंग रूममध्ये शांत वातावरण राखण्याचा प्रयत्न करेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता ते फक्त एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसतील.