Rohit Sharma Instagram Post: भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात खेळताना दमदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला १-२ ने पराभवाचा सामना करावा लागला. पण रोहितचं शतक हे भारतीय संघाला दिलासा देणारं ठरलं आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित अवघ्या ८ धावा करत माघारी परतला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. तर मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने दमदार शतक झळकावलं. वनडे मालिका झाल्यानंतर टी-२० मालिका सुरू होणार आहे. रोहित या संघाचा भाग नसणार आहे. त्यामुळे तो मायदेशी परतला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियात शेवटचा सामना खेळून भारतात येण्यापूर्वी त्याने एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या तुफान चर्चेत आहे.
रोहित शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने ऑस्ट्रेलिया दौरा झाल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेला फोटो हा सिडनी विमानतळावरील आहे. या फोटोत तो हात वर करून टाटा बायबाय करताना दिसून येत आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने, “सिडनीमधून अखेरचा निरोप घेताना (Signing Off)”, असे लिहिले आहे. ही स्टोरी शेअर केल्यानंतर एकच चर्चा रंगली आहे, की हा रोहितचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा होता. यानंतर रोहित पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार नाही.
रोहित शर्मा क्रिकेट खेळणं सुरू ठेवणार आहे. पण तो पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार नाही. कारण रोहितने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेपर्यंत भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही. त्यामुळे विराट आणि रोहितचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया ठरला.
रोहित २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळणार का?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धा खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या दौऱ्यावर येण्यापूर्वी रोहितने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली. त्याने ११ किलो वजन कमी केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात तो स्वस्तात माघारी परतला. पण त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली आणि तिसऱ्या सामन्यात त्याने शतक झळकावलं. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्माच्या बालपणीच्या प्रशिक्षकाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, रोहित २०२७ चा वनडे क्रिकेट वर्ल्डकप खेळून झाल्यानंतर निवृत्तीची घोषणा करणार आहे.
