Srilanka vs Bangladesh Last Over Thriller: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत सोमवारी (२० ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला. या सामन्यात श्रीलंकेने ७ धावांनी दमदार विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी ९ धावा करायच्या होत्या. त्यावेळी ५ फलंदाज शिल्लक होते. ६ चेंडूत ९ धावांची गरज असताना बांगलादेशला विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण श्रीलंकेच्या गोलंदाजाने शेवटच्या षटकात दमदार विजय मिळवून दिला.
शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?
बांगलादेशला शेवटच्या षटकात विजयासाठी ९ धावा करायच्या होत्या. तर श्रीलंकेला ९ धावांचा यशस्वी बचाव करायचा होता. या धावांचा बचाव करण्यासाठी श्रीलंकेकडून चमारी अटापट्टू गोलंदाजीला आली. तिने या षटकातील पहिल्याच चेंडूवर रबेया खानला पायचित करत माघारी धाडलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर नाहीदा अख्तर धावबाद झाली. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर निगर सुल्ताना झेलबाद होऊन माघारी परतली. सुरूवातीच्या ३ चेंडूंवर बांगलादेशचे ३ फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर चौथ्या चेंडूवर मरूफा अख्तर पायचित झाली. सलग ४ चेंडूत ४ फलंदाज माघारी परतल्यानंतर बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी २ चेंडूत ९ धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर बांगलादेशच्या फलंदाजाने १ धाव घेतली. तर शेवटच्या चेंडूवर एकही धाव घेता आली नाही. यासह श्रीलंकेने हा सामना जिंकला.
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव ४८.४ षटकात २०२ धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून फलंदाजीला आलेल्या हसीनी परेरा ९९ चेंडूंचा सामना करत ८५ धावांची दमदार खेळी केली. संघाची कर्णधार चमारी अटापट्टूने ४३ चेंडूंचा सामना करत ४६ धावांची खेळी केली. तर डी सिल्वाने ३८ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. बांगलादेशकडून शोरना अख्तरने २७ धावा खर्च करून ३ गडी बाद केले.
बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी २०३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. बांगलादेशला हा सामना जिंकण्याची संधी होती. पण ५० षटकांअखेर बांगलादेशला ९ गडी बाद १९५ धावांपर्यंत मजल मारता आली. या पराभवानंतर बांगलादेशचा संघ अधिकृतरित्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.