Smriti Mandhana on India Women’s ODI World Cup Win: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे जेतेपद पटकावले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत ५२ धावांनी विजय मिळवून इतिहास रचला. भारताच्या या विजयावर स्मृती मानधनाने मोठं वक्तव्य केलं आहे.

क्रिकेटच्या मैदानावर फार कमी वेळेस भावुक होणारी स्मृती मानधनाला भारत विश्वचषक जिंकताच अश्रू अनावर झाले. कर्णधार हरमनप्रीत कौरला मिठी मारत भावुक झालेली पाहायला मिळाली. दरम्यान स्मृती भारताच्या विजयानंतर नेमकं काय म्हणाली पाहूया.

स्मृती मानधना म्हणाली, “मला अजूनही कळत नाही, काय बोलू, काय प्रतिक्रिया देऊ. मी मैदानावर कधी भावुक होत नाही, पण हा कमालीचा क्षण आहे. प्रत्येक वर्ल्डकपमध्ये आपण आतापर्यंत अनेकदा निराशा पदरी पडली आहे. प्रत्येक वेळी मनं दुखावली. पण तरीही एक गोष्ट ठाम होती, आपली जबाबदारी फक्त जिंकण्यापुरती नव्हती, तर महिला क्रिकेटचा पाया अधिक मजबूत करण्याची होती. आणि खरंच सांगायचं, गेल्या दीड महिन्यात मिळालेल्या लोकांच्या पाठिंब्याकडे अविश्वसनीय होता.”

“गेले ४० दिवस कसे होते, मी शब्दात मांडू शकत नाहीये. आज अखेर हा वर्ल्डकप हातात घेताना असं वाटतंय की त्या न झोपता काढलेल्या ४५ रात्री याच क्षणासाठीच होत्या. मागचा टी-२० वर्ल्डकप आपल्या सगळ्यांसाठी खूप कठीण होता. पण त्यानंतर आम्ही एकच गोष्ट ठरवली. प्रत्येकजण आपल्या फिटनेसवर, प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर फोकस करणं यावर होता,” असं पुढे स्मृती मानधना म्हणाली.

स्मृती म्हणाली, “खरं सांगायचं तर या संघाची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे संघातील एकजूट. चांगल्या-वाईट दोन्ही काळात आम्ही एकमेकांबरोबर उभे राहिलो. प्रत्येकाच्या यशाचा एकत्र खऱ्या अर्थाने आनंद साजरा केला. या वेळी टीम वातावरण इतकं सकारात्मक, इतकं कमालीचं होतं.”

स्मृती मानधनाने यंदाच्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ४३४ धावा केल्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत स्मृती दुसऱ्या स्थानी आहे. याशिवाय स्पर्धेत स्मृती एक शतकंही झळकावलं.